सचिन, दीपिका, करीनाला गोव्याचा नकार

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनेत्री दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि सैफ अली खान यांसारखे लोकप्रिय सेलिब्रिटी गोवा राज्याचे ब्रँड अँबेसिडर बनण्यासाठी रांगेत असताना या सर्वांना गोव्याने चक्क नकार दिला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 26, 2013, 05:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
एकीकडे महाराष्ट्र पर्यटनासाठी ब्रँड अँबेसिडर मिळाला नसताना गोव्याने चक्क बड्या सेलिब्रिटींना नकार दिला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनेत्री दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि सैफ अली खान यांसारखे लोकप्रिय सेलिब्रिटी गोवा राज्याचे ब्रँड अँबेसिडर बनण्यासाठी रांगेत असताना या सर्वांना गोव्याने चक्क नकार दिला आहे. गोव्याच्या पर्यटन प्रसिद्धीसाठी कुठल्याही सेलिब्रिटीची गरज नाही, असं गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परूळेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
“गोवा राज्य हे स्वतःच सेलिब्रिटी आहे. त्यामुळे आम्हाला गोव्याच्या प्रसिद्धीसाठी कुठल्याही सेलिब्रिटींची गरज नाही. आमच्याकडे मार्केटिंग एजन्सींकडून दीपिका पदुकोण, सचिन तेंडुलकर, करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान यांच्या नावांचे प्रस्ताव आले होते. या सेलिब्रिटींना गोव्याचे ब्रँड अँबेसिडर होण्यात रस आहे. मात्र आम्हाला आमच्या राज्याचं प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रिटींची गरज नाही.” असं परुळेकर म्हणाले.
“गोव्याचं नाव जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटक भारतात येण्याचं ठरवतात, तेव्हा त्यांची पहिली पसंती गोवाच असते.” असं परुळेकर म्हणाले. काही वर्षांपूर्वी प्राची देसाईला गोव्याची ब्रँड अँबेसिडर बनवण्यात आलं होतं.
IANS

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.