मंगळयानालाही टोचणार इंजेक्शन!

मंगळयानात आलेला अथडळा दूर झाल्यानं भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवात जीव आलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे... ‘इंजेक्शन’!

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 13, 2013, 10:26 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, बंगळुरू
मंगळयानात आलेला अथडळा दूर झाल्यानं भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवात जीव आलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे... ‘इंजेक्शन’!
होय, इंजेक्शन... हे इंजेक्शन देण्यात येणार आहे ते नुकतंच पृथ्वीवरून मंगळावर रवाना झालेल्या मंगळयानाला. ‘ट्रान्स मार्स’ नावाचं हे इंजेक्शन येत्या सोमवारी १ डिसेंबर रोजी मंगळयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर नेऊन देण्यात येईल. त्यानंतर या मंगळयानाचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू होईल. अशी माहिती इस्रोच्या प्रवक्त्यांनी दिलीय.
सोमवारी मंगळयानाच्या द्रवरूप इंजिनाला होणारा इंधनाचा प्रवाह थांबल्यानं मोहीम अडचणीत आल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पण, कक्षा वाढविण्याचा टप्पा यशस्वी पार झाल्यानं सर्वकाही व्यवस्थित आहे असं इस्त्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, की सर्वकाही नियोजनानुसार होत आहे. त्यामुळं सध्या सगळं ठीक आहे.
कक्षा वाढविण्याच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळयानाचं पृथ्वीपासूनचं सर्वांत दूरचं अंतर ७१, ६२३ किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आलं होतं. सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यात हे अंतर एक लाख किलोमीटरपर्यंत वाढविण्याचं उद्दिष्ट असताना `इस्रो`ला हे अंतर ७८,२७६ किलोमीटरपर्यंतच वाढविण्यात यश आलं होतं.

यावेळी यानाचा वाढीव वेग १३० मीटर प्रतिसेकंद अपेक्षित असताना तो फक्त ३५ मीटर प्रतिसेकंद गाठता आला होता. हे अंतर भरून काढण्यासाठी `इस्रो`नं आज पहाटे पाच वाजता कक्षा वाढविण्याचा अतिरिक्त कार्यक्रम हाती घेण्याचं ठरविलं होतं. त्यानुसार हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं सांगण्यात येतंय. सर्व पाच कक्षा वाढविण्याचा टप्पा पार केल्यानंतर एक डिसेंबरला मंगळमोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.