दलित विद्यार्थी आत्महत्येवर स्मृती इराणींचं स्पष्टीकरण

Updated: Jan 20, 2016, 08:04 PM IST
दलित विद्यार्थी आत्महत्येवर स्मृती इराणींचं स्पष्टीकरण title=

नवी दिल्ली-  हैदराबाद विद्यापीठात झालेली विद्यार्थ्याची आत्महत्या हा दलित आणि  दलितेतर मुद्दा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलंय. या मुद्द्याला जातीचा रंग देऊन जाणून बुजून लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

रोहित वेमुलानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये कोणत्याही खासदार आणि राजकारण्याचं नाव नसल्याचंही स्मृती इराणी म्हणाल्यात. या आत्महत्येवरुन चुकीची माहिती पसरवली जात आहे, त्यामुळे मला स्पष्टीकरण द्यावं लागतंय असं स्पष्टीकरण स्मृती इराणींनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

आपल्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस या मुद्द्याचा वापर करत असल्याचा आरोपही स्मृती इराणींनी केलाय.या पत्रकार परिषदेमध्ये स्मृती इराणींनी खासदार हनुमंत राव यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला लिहिलेल्या  २०१४ च्या पत्राचा दाखला दिलाय. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर त्यांनी हे पत्र लिहीलं होतं.  या पत्राची दखल तेव्हाच घेतली असती तर रोहीतचा जीव वाचला असता असं प्रत्युत्तर इराणींनी काँग्रेसला दिलंय.

हैदराबाद विद्यापीठातला दलितांवर रिसर्च करणाऱ्या रोहित वेमुलानं हॉस्टेलमध्ये गळफास लावून रविवारी आत्महत्या केली होती. विद्यपीठानं निलंबित केलेल्या ५ दलित विद्यार्थ्यांपैकी रोहित हा एक होता. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रोहित गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत होता.