लोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.

Updated: Dec 9, 2014, 11:30 AM IST
लोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी  title=

नवी दिल्ली : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.

एकूण सहा राष्ट्रीय पक्षांचा खर्च जाहीर करण्यात आलाय, मात्र केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेला भाजपा आणि विरोधीपक्ष कॉंग्रेसने मात्र अद्यापही निवडणूक खर्चाचा तपशील दिला नसल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या खर्चाचा आकडा अजून तरी जाहीर झालेला नाही.

निवडणूक आयोगाकडील ताज्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा निवडणुकांमध्ये सर्वाधिक खर्च करणारा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 51 कोटी 34 लाख 44 हजार 854 एवढा खर्च केला आहे. 

राष्ट्रवादीच्या खालोखाल मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने 30 कोटी 5 लाख 84 हजार 822 रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने 18 कोटी 69 लाख 18 हजार 169 रुपये एवढा खर्च दाखवला आहे.

2014 मध्ये लोकसभा तसेच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली. कॉंग्रेस आणि भाजपने आतापर्यंत आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा खर्च दिलेला नसल्याचे आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा खर्चाचा तपशील समोर आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिला क्रमांक गमाविण्याची शक्‍यता आहे. पण, सध्या तरी सहा राष्ट्रीय पक्षांमध्ये राष्ट्रवादीच आघाडीवर आहे.

निवडणूक आयोगाने मागील महिन्यातच निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या 20 राजकीय पक्षांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात कॉंग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष सारख्या काही महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. खर्चाचा तपशील सादर न केल्यास या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही आयोगातर्फे देण्यात आला होता. 

नियमानुसार राजकीय पक्षांना लोकसभा निवडणूक संपल्याच्या 90 दिवसांच्या आत आणि विधानसभा निवडणुकांच्या 75 दिवसांच्या आत निवडणुकांचा खर्च सादर करावा लागतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.