मुख्यमंत्री चव्हाण दिल्ली, केंद्रात १५ नवे चेहरे?

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 24, 2012, 07:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान या बैठकीपूर्वी काही कॅबिनेटमध्ये बदल करण्यात आले आहेत. एफडीआय, स्वयंपाकाचा गॅस आणि डिझेलमध्ये दरवाढ केल्यानंतर तृणमूलच्या सहा मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारला बदल करणे भाग पडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेटमध्ये १५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
सी. पी. जोशी यांना रेल्वे मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यांना संपूर्ण रेल्वे मंत्रालय देण्यात येण्याची शक्यता आहे. हे मंत्रालय काँग्रेसकडे जवळपास १६ वर्षांनंतर येणार आहे.
तृणमूलच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पश्चिम बंगाल काँग्रेसमधून दोन ते तीन जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात दीपा दासमुन्शी, अधीर चौधरी आणि पश्चिम बंगाल पीसीसीचे प्रमुख प्रदीप भट्टाचार्य यांनाही मंत्रीपद देण्याची शक्यता आहे.
या खेरीज कॅबिनेट मंत्री म्हणून ज्याचा समावेश होऊ शकतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेता चिरंजीवी, तारिक अन्वर, ज्योति मिर्धा, मिनाक्षी नटराजन, के. आर. रहमान खान, जनार्दन द्वेदी, मनीष तिवारी, विलास मुत्तेमवार, पीएल पुनिया, सत्यव्रत चतुर्वेदी, नारायण राणे, गुरूदास कामत, शशी थरूर यांचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे.
तसेच एस. एम. कृष्णा, बेनी प्रसाद वर्मा, सुबोधकांत सहाय, श्रीप्रकाश जैयस्वाल, मुकुल वासनिक आणि अगाथा संगमा यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता आहे.