पद्मनाभस्वामी मंदिरातलं 80 कोटींचं सोनं चोरीला

तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी, गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 27, 2014, 11:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.
गोपाळ सुब्रमण्यम यांना 35 दिवसांच्या पाहणीनंतर मंदिर आवारात सोन्याचा मुलामा देणारे यंत्र आढळले असून देवस्थानच्या मालकीचे शुद्ध सोने आणि अलंकार बेपत्ता करण्यात आले आहेत. त्याच्या ठिकाणी बनावट वस्तू ठेवल्या गेल्याची भीती न्यायालयापुढील जबानीत त्यांनी व्यक्त केली.
मंदिराचे व्यवस्थापन तसंच संपत्ती आधारित असलेल्या अहवालामध्ये मंदिराच्या अलोट संपत्तीबद्दल गैरव्यवस्था असण्यामागे मोठे कारस्थान असल्याची भीती व्यक्त करून माजी कॉम्प्ट्रोलर जनरल विनोद राय यांच्याकडून सदर संपत्तीची तपशीलवार मोजदाद करण्याची सूचनाही सदर अहवालामध्ये करण्यात आली आहे.
इतिहास पद्मनाभ मंदिराचा
त्रावणकोर संस्थानच्या राज घराण्याच्या मालकीच्या असलेला तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या अलोट संपत्तीचा शोध तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार मंदिरातील संपत्ती 1 लाख कोटींच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या संपत्तीपैकी बरीच संपत्ती बेपत्ता केली जात असल्याची भीती सुप्रीम कोर्टाच्या सुपूर्द केलेल्या अहवालात करण्यात आली आहे.
मंदिर खजिन्याचे A पासून F पर्यंत कक्ष उघडून त्यातील संपत्तीची यादी बनवण्यात आली आहे. सुब्रमण्यम यांनी B कक्षही उघडून त्यातील संपत्तीची नोंद करण्याची सूचना केली आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये भक्तांकडून आलेल्या दूर्मिळ रत्ने आणि सोनेसारख्या वस्तूंचा हिशोब मंदिर व्यवस्थापनानं न ठेवल्यानं त्याचंही ऑडिट होणं आवश्यक असल्याचं सुब्रमण्यम यांनी सांगितलं आहे.
दुर्मिळ रत्ने, रत्नजडित मुकुट, सोन्याचे व चांदीच्या नाण्यांचे ढीग, चांदी व पितळी थाळय़ा, दिवे, मूर्ती यांची किंमत 2011 मध्ये 1 लाख कोटी ठरविण्यात आली होती. त्यामुळं एका रात्रीत देशातील अत्यंत श्रीमंत देवस्थानापैकी एक अशी प्रसिद्धी पद्मनानाभन मंदिराला मिळाली आहे. प्राचीन त्रावणकोर राजघराण्यातील नाणी तसेच नेपोलियन काळातील आणि इस्ट इंडिया कंपनीच्या नाण्यांचाही शोध या खजिन्यात घेण्यात आला आहे. प्राचीन काळापासून तिथं असलेली संपत्ती मंदिर व्यवस्थापनाकडून राज्य शासनाला देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मंदिराच्या मालकीच्या संपत्तीचा शोध घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.