भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 27, 2013, 01:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडच्या महाप्रलयातून देशवासियांना वाचवण्यासाठी जवान जीवाची पर्वा न करता बचावकार्य करत आहेत. नेते मात्र श्रेयाच्या लढाईसाठी थेट हातापाईवर उतरल्याचा संतापजनक प्रकार डेहराडूनच्या विमानतळावर पाहायला मिळाला. आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.
टीडीपी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर जोरदार नारेबाजीही केली. त्यातून वर्चस्व दाखविण्याचं आणि आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांना मदत करून श्रेय लाटण्याची त्यांचा लालचीपणा स्पष्ट दिसून येत होता. हनुमंतराव यांनी केलेल्या दाव्यानुसार, टीडीपी नेत्यांनी अडकलेल्या भाविकांना आंध्रप्रदेश सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या विमानांमध्ये चढण्यापासून थांबवलं. हे विमान हैदराबाद जाणार होतं. टीडीपी नेत्यांनी या भाविकांना ‘आम्ही तुम्हाला दिल्लीला पोहचवण्यासाठी आणखी एका विमानाची सोय केलीय’ असं सांगून त्यांनी भाविकांना या विमानात चढण्यापासून रोखलं असं त्यांचं म्हणणं... यावरूनच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.

दोघेही आपल्या राज्य़ातल्या नागरिकांच्या मदतीसाठी गेले होते की केवळ चमकोगिरी करण्यासाठी असाच प्रश्न आता उपस्थित झालाय. मात्र, दोघांच्या या कृत्यामुळं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.