दरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

Updated: Jul 31, 2016, 05:22 PM IST
दरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  title=

बुलंदशहर : उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. हे कुटुंब नोएडावरून शाहजहापूरला जात असताना दरोडेखोरांनी त्यांना बुलंदशहरजवळ अडवलं आणि त्यांना हायवेवरच्या 50 मीटर लांब शेतामध्ये घेऊन गेले. शेतामध्ये त्यांनी या कुटुंबाला लुटलं आणि आई-मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

हे कुटुंब तेराव्यासाठी गावाला जात असताना धक्कादायक प्रकार घडला आहे. अॅसेंट कारमधून दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, छोटा भाऊ, 13 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांचा मुलगा नोएडावरून शाहजहापूरला जात होते. रात्री साडेअकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग 91वर त्यांच्या गाडीचा टायर फाटल्याचा आवाज आला. यामुळे गाडी थांबवून ते उतरले तेव्हा सहा ते सात जणांनी त्यांना अडवलं. 

दोन भाऊ आणि 10 वर्षांच्या मुलाला या दरोडेखोरांनी ओलीस ठेवलं आणि दोन्ही महिला आणि अल्पवयीन मुलीला ते शेतात घेऊन गेले. यातली लहान महिला आणि अल्पवयीन मुलीवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. 

या प्रकरणी पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तीन तास या दोघींवर दरोडेखोरांनी अत्याचार केले आणि तिथून पळ काढला. हे आरोपी राजस्थानचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.