अफगाणिस्तानात पुन्हा शिरण्याचा तालिबानचा डाव!

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.

Updated: Oct 5, 2013, 06:17 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.
१९९६ च्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये स्वतःची सत्ता स्थापन करण्यास पाकिस्तानची फार मोठी मदत तालिबानला झाली होती. पण ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्याशी संबंधित असलेल्या ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख अतिरेक्यांना संरक्षण दिल्यामुळे तालिबानी अमेरिकेसाठी शत्रू झाले.
अमेरिकेने आणि नाटोच्या फौजांनी अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानी अतिरेक्यांना तेथून हाकलून लावले. नाटोच्या हल्ल्यात पराभूत झाल्यानंतर तालिबानच्या सैनिकांनी पाक-अफगाण सीमेवरील जंगलांमध्ये तसेच डोंगराळ प्रदेशांत आश्रय घेतला होता.
पण, नाटो फौजांनी टप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा डोकं वर काढलंय. पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय (पाकची गुप्तहेर संघटना) तालिबानला पुन्हा ताकद पुरवत आहेत. नव्याने सज्ज होत असलेले तालिबान अफगाणिस्तानला २०१४ नंतर पुन्हा एकदा इस्लामी अमिरात करण्याचं स्वप्न बघतंय, असं ‘द इंडिपेंडन्ट’नं आपल्या वृत्तात म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.