‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण

मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात  बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता. 

Updated: Oct 21, 2016, 06:27 PM IST
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण title=

मुंबई : मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात  बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता. 

खाली दोन व्हिडिओ आहेत...

अजय देवगण या कार्यक्रमात आपली पत्नी आणि अभिनेत्री काजोलसह सहभागी झाला. त्यांच्यासोबतीने संगीतकार मिथुनसुद्धा उपस्थित होते. येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

 

या मंचावरुन आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. या मंचाची लोकप्रियतेचा बोलबाला बॉलिवुडमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे म्हणूनच तर या कार्यक्रमात रितेश देशमुख , जॉन अब्राहम, वरुण धवन, सोनम कपूर, विद्या बालन, इरफान खान या कलाकारांसोबतच शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या आजच्या घडीच्या सुपरस्टार्सनीही हजेरी लावली. आता या यादीत आणखी एका स्टारचा समावेश झाला आहे.

पाहा व्हिडिओ...

 

‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या दोघांसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. 

सिंघमच्या भूमिकेत भाऊ कदमने तर जयकांत शिकरेच्या भूमिकेत सागर कारंडेने विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. याशिवाय थुकरटवाडीच्या कोर्टात अजय आणि काजोल दोघांनाही आरोपीच्या पिंज-यात बसवून त्यांच्यावर अनेक मजेदार आरोपही करण्यात आले. 

यावेळी कलाकारांचा अतरंगीपणा बघून अजय आणि काजोल दोघांचीही हसून हसून पुरेवाट लागली. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. या दोघांचं हे मराठमोळं रुप येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणा-या चला हवा येऊ द्या च्या दोन्ही भागांमधून बघायला मिळेल.