अखेर, रिंकूला शाळा सोडावी लागली!

'सैराट' या चित्रपटात आर्चीच्या भूमिकेत भाव खाऊन गेलेली रिंकू राजगुरू आता शाळा सोडणार असं दिसतंय... असं असलं तरी तिचं शिक्षण मात्र सुरूच राहील. 

Updated: Sep 14, 2016, 09:51 AM IST
अखेर, रिंकूला शाळा सोडावी लागली! title=

मुंबई : 'सैराट' या चित्रपटात आर्चीच्या भूमिकेत भाव खाऊन गेलेली रिंकू राजगुरू आता शाळा सोडणार असं दिसतंय... असं असलं तरी तिचं शिक्षण मात्र सुरूच राहील. 

गर्दीच गर्दी

रिंकू यंदा दहावीला आहे. 'सैराट'ला मिळालेल्या प्रचंड आणि अनपेक्षित यशानंतर आर्चीला पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकच झुंबड उडाली. जिथे जाईल तिथे तिच्या मागे गर्दीच दिसून आली. यामुळे तर तिला शाळेत जाणंही मुश्किल होऊन बसलं. 

शाळा सुरु झाल्यानंतर आठवडा उलटला तरी ती शाळेत हजर झाली नव्हती. त्यामुळे ती शिकत असलेल्या अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाळेच्या व्यवस्थापणाने तिला खडे बोल सुनावले होते. परंतु, रिंकूची क्रेझ इतकी वाढली होती की तिला सुरक्षा कवचाशिवाय फिरणं शक्य नव्हतं. ही गर्दी आवरणं शाळा प्रशासनालाही शक्य नाही. 

शाळा सोडण्याचा निर्णय

इतकंच नाही, तर रिंकू जेव्हा शाळेत जायला लागली तेव्हा तिच्या भोवती मुलांचाही गराडा पडू लागला. एक सामान्य विद्यार्थीनी म्हणून शिक्षण घेणं शक्य होणार नाही असं दिसल्यामुळे रिंकूनं शाळा सोडण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एसएससीचा १७ नंबरचा फॉर्म भरलाय. त्यामुळे, शाळेत न जाताही घरीच अभ्यास करून रिंकूला बोर्डाची परीक्षा देता येणं शक्य होणार आहे.  

रिंकूनं नववीत ८१.०६ टक्के मार्क मिळवलेत. ती एक हुशार विद्यार्थीनी आहे. त्यामुळे आता तिला दहावीत किती मार्क्स मिळणार? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आणि शुभेच्छुकांनाही लागून राहिलीय.