सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५

२००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...

Updated: May 6, 2015, 03:36 PM IST
सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५  title=

मुंबई : २००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...

२८ सप्टेंबर २००२ :
सलमान खानच्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटा लॅन्ड क्रूझर या गाडीचा अपघात झाला. ही गाडी वांद्र्यातील हील रोडवरील अमेरिकन एक्सप्रेस या बेकरीत घुसली. या बेकरीच्या बाहेर फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले.

२८ सप्टेंबर २००२ : 
सलमान खानचे रक्ताचे नमुने घेतले गेले

२८ सप्टेंबर २००२ : 
सलमान खानला वांद्रे पोलिसांनी अटक केली... त्यानंतर काही वेळातच त्याला जामीनही मिळाला.

१ ऑक्टोबर २००२ : 
सलमान खानवर मोटार वाहन अधिनियम कायदा १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 

७ ऑक्टोबर २००२ : 
सलमाननं वांद्रे कोर्टासमोर शरणागती पत्करली. त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 

२१ ऑक्टोबर २००२ : 
मुंबई पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात चार्जशीट दाखल केली.

२४ ऑक्टोबर २००२ : 
सलमानला पुन्हा जामीन मिळाला

मार्च २००३ : 
सदोष मनुष्यवध अर्थात भारतीय दंड विधान कलम ३०४ - II ला सलमाननं मुंबई सेशन कोर्टात आव्हान दिलं.  

मे २००३ : 
मुंबई सेशन कोर्टानं सलमानची याचिका फेटाळली आणि दंडाधिकारी न्यायलयात जाण्याची सूचना केली.  

जून २००३ : 
सलमाननं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं सलमानवरचं भारतीय दंड विधान ३०४-II हे कलम या प्रकरणातून वगळण्याचे आदेश दिले.

ऑक्टोबर २००३ : 
महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. 

डिसेंबर २००३ : 
भारतीय दंड विधान ३०४-II हे कलम लागू करावं किंवा नाही याचे अधिकार सुप्रीम कोर्टानं दंडाधिकारी न्यायालयाकडे सोपवले. 

ऑक्टोबर २००६ : 
दंडाधिकाऱ्यांनी सलमानविरुद्धचे आरोप निश्चित केले. 

३ ऑक्टोबर २००७ : 
सलमानचा पोलीस बॉडीगार्ड रविंद्र पाटील याचा क्षयरोगानं मृत्यू... रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. 

ऑक्टोबर २०११ : 
सलमानला कठोरात कठोर शिक्षा देण्याची फिर्यादींची मागणी

२३ डिसेंबर २०१३ : 
१७ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी व्ही एस पाटील यांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि पुढच्या सुनावणीसाठी हा खटला पुन्हा सत्र न्यायालयाकडे सुपूर्द केला. 

२४ जून २०१३ : 
सेशन कोर्टानंही या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा योग्य असल्याचा निर्वाळा दिला आणि सलमानचा दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचा अर्ज फेटाळला.

२७ एप्रिल २०१४ : 
मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा नव्याने या खटल्याची सुनावणी सुरु झाली.... आणि पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली गेली. 

२४ जुलै २०१४ : 
सत्र न्यायालयात सलमान खान विरुद्धचे आरोप निश्चित करण्यात आले. 

जुलै २०१४ : 
या प्रकरणासंबंधित वांद्रे पोलीस स्टेशनमधल्या फाईल गहाळ झाल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. यामध्ये, घटनेनंतर नोंदवण्यात आलेल्या ६३ साक्षीदारांच्या साक्षींची नोंद 
होती. कोर्टानं यासंबंधी चौकशीचे आदेश दिले.

१२ सप्टेंबर २०१४ : 
गहाळ फाईल्स सापडल्या आणि कोर्टासमोर सादर करण्यात आल्या. 

सप्टेंबर २०१४ : 
विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात आली. 

२५ मार्च २०१५ : 
फिर्यादी पक्षाच्या वतीनं सरकारी वकिलांनी २४ साक्षीदारांची उलटतपासणी घेतली.  

२७ मार्च २०१५ : 
कलम ३१३ अंतर्गत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी डब्ल्यू देशपांडे यांनी सलमान खानचा जवाब नोंदवून घेतला.

३१ मार्च २०१५ : 
सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंग याची वचाव पक्षाच्या वकिलांनी साक्ष घेतली. यावेळी अशोक सिंगनं अपघाता दरम्यान आपणच गाडी चालवत असल्याची साक्ष दिली.

१ एप्रिल २०१५ : 
फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली.

१० एप्रिल २०१५ : 
सलमान खानच्या वकिलांनी आपली बाजू मांडली

२० एप्रिल २०१५ : 
दोन्ही पक्षांच्या वतीनं युक्तीवाद संपला

२१ एप्रिल २०१५ : 
कोर्टानं ६ मे रोजी निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं. 

६ मे २०१५ :

- सलमान खानविरुद्धचे सगळे गुन्हे कोर्टात सिद्ध झाल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं. 
- १ वाजून १० मिनिटांनी न्यायाधिशांनी निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं.
- न्यायाधिशांनी न्यायालयात निकाल देण्यापूर्वीच न्यायालयातील वीज गेली. 
 - या प्रकरणात सलमान खान दोषी असून त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
- सलमानला सदोष मनुष्य वध कलमांतर्गत २५ हजार रुपयांचा दंड तसंच मोटार वाहन अधिनियम कायदा १९८८ नुसार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.