ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - लातूर शहर

लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी लातूर शहर हा मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ. आता या मतदारसंघातून विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख विद्यमान आमदार आहेत. 

Updated: Oct 8, 2014, 04:28 PM IST
 title=

लातूर : लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी लातूर शहर हा मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ. आता या मतदारसंघातून विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख विद्यमान आमदार आहेत. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - श्रीपाद कुलकर्णी
भाजप - शैलेश लाहोटी
काँग्रेस - अमित देशमुख
राष्ट्रवादी - मुर्तजा खान 
मनसे - गणेश गवारे            
 

लातूर ते दिल्ली अशी राजकीय भरारी मारणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ. अर्थातच काँग्रेसचा बालेकिल्ला. दिलखुलास व्यक्तिमत्व आणि तितकच सर्वांना भावणारं वक्तृत्व यामुळे विलासरावांची छाप या मतदारसंघावर अखंडपणे राहिली. 

म्हणूनच विलासरावांच्या दुर्दैवी निधनांतर नेतृत्व हरपल्याची भावना इथले सर्वसामान्य नागरिक आजही व्यक्त करतात. 2009 च्या पुनर्रचनेत लातूर शहर आणि परिसरातील 29 गावांचा मिळून लातूर शहर हा मतदारसंघ तयार झालाय. 

2009 च्या निवडणुकीत विलासरावांनी अमित देशमुखांना मैदानात उतरवलं. अमित देशमुख तब्बल 89 हजार 480 मतांच्या आघाडीने निवडून आले. 
- शहरातील अंतर्गत रस्ते
- 30 कोटींची पाणीपुरवठा योजना
- कचरा समस्येवर उपाययोजना
- 1 कोटी 14 लाखांची प्रस्तावित कामे

अशी शहरात एकूण 8 कोटी 69 लाख रुपयांची विकासकामे केल्याचा दावा अमित देशमुख यांनी केलाय. अमित देशमुख विकासकामांचा दावा करत असले तरी विरोधकांना ते मान्य नाही. 

लातूरकरांना किमान दोन वेळचे पुरेसे पाणी मिळावे, एवढीच माफक अपेक्षा असल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणंय. राजकारणाच्या या लढाईत लातूरकरांच्या समस्या मात्र आहे तशाच आहेत.
- लातूरचा विकास कंत्राटदारांच्या घशात
- गंजगोलाईला पुन्हा अतिक्रमणांचा विळखा
- वाहतुकीची वाढती समस्या
- 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा
अशा समस्यांनी लातूरकरांना वर्षानुवर्ष घेरलंय.

काँग्रेसचा बालेकिल्ला आणि विलासरावांचा करिष्मा असलेल्या याच मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या डॉ. सुनिल गायकवाड यांना सुमारे 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. आणि हीच अमित देशमुख यांच्यासाठी आगामी विधानसभेसाठी धोक्याची घंटा मानण्यात येतेय.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आता अमित देशमुख कशा प्रकारे राजकीय गणितं हाताळताहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारे. मोदी लाटेवर त्यांच्याकडे काही उत्तर आहे का ? हेच आगामी निवडणुकीत महत्वाचं ठरणारे...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.