ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं – परळी

परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.  

Updated: Oct 7, 2014, 09:35 PM IST
 title=

बीड : परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.  
मुंडे यांच्या निधनानंतर होणारी पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदार संघाकडे लागलंय. धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असाच हा सामना रंगणार असं चित्र सध्यातरी दिसतंय.  

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -       
शिवसेना - (उमेदवार दिलेला नाही)
भाजप - पंकजा मुंडे
काँग्रेस - प्रा. टी. पी. मुंडे
राष्ट्रवादी - धनंजय मुंडे
मनसे - संजय आघाव

बीड जिल्ह्यातील परळी, बारा ज्योतीर्लिंगापैकी एक असलेलं हे ठिकाण. वैजनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे परळी वैजनाथ.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याच मतदारसंघातून नेतृत्व करत. कालांतराने हा मतदारसंघ त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे आला. 

2009 च्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी पाच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. 

मात्र, परळीची जागा राखण्यात पंकजा मुंडे यांना यश आलं. अर्थातच त्यावेळी राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या गोपीनाथ मुंडेंनी आपली ताकद पणाला लावली होती. 

परळी विधानसभा मतदार संघात सुमारे 2 लाख 90 हजार मतदार आहेत. माजलगाव, परळी आणि अंबाजोगाई असा तीन तालुक्यांतील गावांचा यामध्ये समावेश होतो.  
तब्बल चाळीस वर्ष इथे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व होतं. तर 2009 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढवल्याने पंकजा मुंडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानी काँग्रेसच्या टी. पी. मुंडे यांचा 40 हजाराच्या मताधिक्याने पराभव केला. 

मतदारसंघात पाच वर्षात विविध विकासकामे केल्याचं पंकजा मुंडे सांगताहेत.
- शहरातील रस्ते दुरूस्ती
- शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर २२ ठिकाणी तलाव 
- बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार
- वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास 

अशी विकासकामे केल्याचं पंकजा मुंडे सांगतात.तर आगामी काळात अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत संघर्ष यात्रा सुरुच ठेवणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंशी फारकत घेत राष्ट्रवादीशी सलगी केल्याने इथली राजकीय गणितं कमालीची बदलली. काका-पुतण्याची ही लढाई केवळ बीड जिल्ह्यातल्याच जनतेने नव्हे तर उभ्या महाराष्ट्राने अनुभवली. 

दुसरीकडे परळीची काँग्रेसच्या वाट्याची ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे डावपेच सुरू झालेत. 

धनंजय मुंडे यांनी आगामी निवणुकीसाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलंय. सध्याची राजकीय गणितं पाहता पंकजा मुंडे लोकसभा लढवणार की विधानसभा याची उत्सुकता स्वतः आपल्यालाही असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
 
धनंजय मुंडे निवडणुकीसाठी सज्ज झाले असले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू नंतरच्या भावनिक लाटेला ते कसे सामोरे जातात हे पाहणंही औस्तुक्याचं ठरणारे. या राजकीय लढाईत परळीकरांच्या काही समस्या मात्र आहे तशाच आहेत. 

- बेरोजगार युवकांना काम नाही
- पंचतारांकित एमआयडीसीचा प्रकल्प अपूर्ण
- सिंचनाचे मोठे प्रकल्प नाहीत
- थर्मलच्या राखेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर 
- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण, 
- मात्र पर्यटनाच्या दृष्टीने विकास नाही. 

परळी मतदार संघात आज तरी मुंडे यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली सहानुभूती प्रभावी आहे मात्र बहिण विरुद्ध भाऊ लढाई झाली तर निकाल धक्कादायक असेल असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

एकूणच परळी विधानसभा मतदारसंघ यंदा अवघ्या महाराष्ट्र लक्ष वेधून घेणार यात शंका नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.