ऑडिट मतदारसंघ : ओवळा-माजिवडयामध्ये रंगत

ओवळा-माजिवडा मतदारसंघात २००९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. पण यंदा महायुती आणि आघाडी तुटल्यानं आयत्या वेळी उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षांवर आली. एकतर्फी वाटणारी ही लढत आता चांगलीच चुरशीची झाली आहे. 

Updated: Oct 8, 2014, 10:06 AM IST
ऑडिट मतदारसंघ : ओवळा-माजिवडयामध्ये रंगत title=

ठाणे : ओवळा-माजिवडा मतदारसंघात २००९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. पण यंदा महायुती आणि आघाडी तुटल्यानं आयत्या वेळी उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षांवर आली. एकतर्फी वाटणारी ही लढत आता चांगलीच चुरशीची झाली आहे. 

ओवळा माजिवडा मतदारसंघ म्हणजे ठाणे आणि मिरा भाईंदर या दोन महापालिकातील काही प्रभागांचा मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक येथून विजयी झाले होते. पण आता युती आणि आघाड्या या दोन्ही तुटल्याने सर्वच समीकरणे बदलली आहेत. 

घोडबंदर येथील नवे मतदार तसेच मिरा भाईंदर येथील मतदार काय भूमिका घेणार यावर खूप काही अवलंबून आहे. शिवसेनेने याही वेळेस प्रताप सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. गेली पाच वर्षात मी खूप कामे केली आहेत मग ते उड्डाणपूल असो किंवा पाण्याचा प्रश्न असो. याहीवेळी मतदारराजा मलाच कौल देईल, असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केलाय. 

भाजपामधून ठाणे महापालिकेतील अपक्ष नगरसेवक संजय पांडे रिंगणात आहेत. पांडे हे २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेच्या वेळेस त्यांनी महायुतीला सहकार्य केले होते. पण पुढे त्यांनी  त्यांनी लोकशाही आघाडीला साथ दिली. आयत्या वेळेस भाजपाने त्यांना उमेदवारी देवून रिंगणात उतरवलंय. याच मतदार संघाचा भाग असलेल्या मीरा भाईंदर येथील भाजपचे ११ नगरसेवक आहेत. या ठिकाणी गुजराती, मारवाडी समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हे सर्व लोक फक्त भाजपालाच मतदान करणार, असा दावा पांडे करतायेत. 

मनसेच्यावतीने स्थायी समितीचे सभापती सुधाकर चव्हाण  पुन्हा रिंगणात आहेत. २००९ मध्ये चव्हाण यांना दुस-या क्रमांकाची मतं मिळाली होती. स्थानिक आमदारांनी फक्त नारळ फोडण्याचे काम केले आहे बाकी कामे शुन्य आहेत. अशी टिका चव्हाण यांनी केलीये. आघाडी तुटल्याचा  फायदा नक्की काँग्रेसला होणार असल्याचा दावा केला जातोय. नेहमीच राष्ट्रवादीने विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसलंय,  आता  दग्याफटक्याची भीती नाही, असं काँग्रेसचे उमेदवार सांगतायेत. 

 राष्ट्रवादीने ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचं पारडं जड आहे, अशा दावा केला जातोय. सरनाईक विरुद्ध जगदाळे अशीच लढत होईल, असं चित्र असलं तरी मतांच्या विभागणीवरच विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.