चंद्रपूरमध्ये दारुबंदी लागू की 'एप्रिल फूल'!

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिलच्या मुहूर्तावर म्हणजेच आजपासून दारूबंदी लागू झालीय. ही बंदी यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे...

Updated: Apr 1, 2015, 10:08 AM IST
चंद्रपूरमध्ये दारुबंदी लागू की 'एप्रिल फूल'! title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिलच्या मुहूर्तावर म्हणजेच आजपासून दारूबंदी लागू झालीय. ही बंदी यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे...

चंद्रपूर जिल्ह्यात  दारूबंदी होण्या आधीच दारूड्यांनी आपापल्या 'स्टॉक'ची सोय करून ठेवलीय. 31 मार्च दारूबंदीआधीचा  शेवटचा दिवस असल्यानं तमाम दारूड्यांनी फुल्टू तर्राट व्हायची अरेंजमेंट करून ठेवली. दारूच्या दुकानांवर आपापला ब्रँड घेण्यासाठी दारूड्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. त्यांच्या एवढ्या उड्या पडल्या की, 31 मार्च दुपारपर्यंत दारूच्या दुकानांवर 'सोल्ड आऊट'ची पाटी लागली आणि दारूडे गल्लोगल्ली 'आऊट' व्हायला सुरूवात झाली. एरव्ही संध्याकाळी गजबजलेल्या दारूच्या दुकानांची शटर सूर्यास्तालाच डाऊन झाली होती. 

आता आजपासून या दुकानात काय व्यवसाय होणार आणि घशाखाली काय उतरणार? या प्रश्नांची उत्तरं लवकरच कळतील. कोणाचे घसे कसे आणि कोणाचे खिसे कसे ओले होणार, हे देखील आजपासूनच समजेल. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 513 मद्य विक्री दुकान परवाने आहेत.  एकूण 40 विशेष पथकांनी  कारवाई करून दारूबंदीची सुरुवात केलीय, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय.  

चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाली असली तरी याचा पूर्ण भार पोलीस यंत्रणेवर आहे. याकरिता जिल्हा नियोजन विकास समितीतून सुमारे 80 लाख रूपयांची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी दिलीय. 

चंद्रपूरात दारूबंदी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील लिकर लॉबीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. दारुबंदीचा निर्णय अल्पकाळासाठी ठरु नये... चंद्रपूर राज्यात आदर्श उदाहरण ठरावं अशीच सुज्ज्ञ नागरिकांची इच्छा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.