पुण्यात राष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा मृत्यू

खेळाच्या मैदानावर मृत्यू होणाऱ्या घटना आज काल वाढल्या आहे. आज सकाळी पुण्यात बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर अक्षय लक्ष्मण भोसले या राष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा मृत्यू झाला. 

Updated: Feb 11, 2015, 04:39 PM IST
पुण्यात राष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा मृत्यू title=

पुणे : खेळाच्या मैदानावर मृत्यू होणाऱ्या घटना आज काल वाढल्या आहे. आज सकाळी पुण्यात बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर अक्षय लक्ष्मण भोसले या राष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा मृत्यू झाला. 

२४ वर्षीय अक्षय भोसले नेहमीप्रमाणे आजही सकाळी सातच्या सुमारास बीएमसीसी मैदानावर व्यायामासाठी आला होता. मैदानाला पहिली फेरी मारत असताना तो अचानक खाली कोसळला. तो खाली पडल्याचे पाहून त्याच्या मित्राने पाणी टाकून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी मैदानावर व्यायामासाठी आलेल्या एका डॉक्टरांनी त्याला पाहिले. त्याची प्रकृती नाजूक होत असल्याचे पाहून रुग्णवाहिका बोलवून त्याला जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

अक्षय भोसले हा बॉस्केटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू होता. तो महाराष्ट्रासाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ संघात खेळला होता. तो भारती विद्यापीठाच्या आयएमडीआर विभागात एचआरमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. गेल्या चार वर्षांपासून तो भारती विद्यापाठाच्या विश्व विद्यालय बास्केटबॉल संघाचा कर्णधार होता. यावर्षी झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापाठ संघाला सुवर्णपदक मिळाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.