'माझ्या मुलांना सांभाळा'... एसएमएस पाठवून बिल्डरची आत्महत्या

उल्हासनगरमधील ख्यातनाम बिल्डर अमर भाटिया यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. मात्र, ती खरंच आत्महत्या आहे की खून, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Updated: Jan 19, 2016, 11:43 AM IST
'माझ्या मुलांना सांभाळा'... एसएमएस पाठवून बिल्डरची आत्महत्या  title=

चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : उल्हासनगरमधील ख्यातनाम बिल्डर अमर भाटिया यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. मात्र, ती खरंच आत्महत्या आहे की खून, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मोहन ग्रुप म्हणजे बांधकाम व्यवसायातलं मोठं नाव... सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल असलेला ग्रुप... या ग्रुपचे तरूण, ३८ वर्षीय डायरेक्टर अमर भाटिया यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सापडला. त्यांच्या मृतदेहाचं डोकं आणि धड वेगळं झालं होतं. भाटियांचा मृत्यू अपघाती असावा, असा प्राथमिक अंदाज उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी वर्तवलाय. मात्र व्हिसेरा आणि रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल.

मयत अमर भाटिया यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मामांना एसएमएस पाठवला होता. 'मी खूप तणावाखाली आहे. माझ्या मुलांना सांभाळा. मी आत्महत्या करत आहे', असं त्यांनी एसएमएसद्वारे कळवलं होतं, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत राणे यांनी दिलीय. याप्रकरणी पोलीस सर्व शक्यता विचारात घेऊन पुढील तपास करत आहेत.

सध्या तरी अमर भाटियांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. मात्र त्यांनी का, कशासाठी आणि कुणामुळं आत्महत्या केली, या बाबींचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.