दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण, गृह राज्यमंत्र्यांमुळे तपासात दिरंगाई?

इंदापूरच्या लाखेवाडीतील दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण घेतलंय. या गुन्ह्यातील आरोपी हे गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळं पोलिस तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय.

Updated: Jul 7, 2015, 10:23 AM IST
दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण, गृह राज्यमंत्र्यांमुळे तपासात दिरंगाई? title=

नितीन पाटणकर, इंदापूर, पुणे : इंदापूरच्या लाखेवाडीतील दलित अत्याचार घटनेनं नवीन वळण घेतलंय. या गुन्ह्यातील आरोपी हे गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळं पोलिस तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय.

रूक्मिणी कांबळेंच्या अश्रूंमध्ये दडलीय अमानुष मारहाणीची वेदना. त्यांच्या मनातली भीती. आणि न्याय मिळत नसल्याची खंत देखील... भिंगारदिवे आणि कांबळे या दोन दलित कुटुंबांवरील हल्ल्याच्या घटनेला दहा दिवस झालेत. पण अजूनही मारहाण करणारे मुख्य आरोपी फरार आहेत. 

पोलीस आणि आरोपींचं संगनमत असल्याचा आरोप आता भिंगारदिवे कुटुंबियांनी केलाय. आरोपी शिंगाडे आणि कुरुंगे यांची तक्रार देण्यासाठी भिंगारदिवे आणि कांबळे इंदापूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही.

हल्ला करणारे आरोपी शिंगाडे आणि कुरुंगे हे इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आणि गृह राज्यमंत्री राम शिंदे यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या दबावामुळेच पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप भिंगारदिवे आणि कांबळे कुटुंबियांनी केलाय.

याप्रकरणी निःपक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, एव्हढीच दलित कुटुंबांची अपेक्षा आहे. मात्र, इथंही त्यांच्यावर पुन्हा अन्यायच होत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, इंदापूर लाखेवाडीतील दलित अत्याचाराच्या घटनेत आरोपींच्या बाजूनं आपण कुठलाही दबाव आणलेला नाही, असा दावा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंनी झी मीडियाकडे केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.