कोकण रेल्वेच्या 28 स्टेशनवर मोफत वायफाय

कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर लवकरच मोफत वायफाय सेवा सुरू होणार आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 17, 2017, 09:19 AM IST
कोकण रेल्वेच्या 28 स्टेशनवर मोफत वायफाय title=

मुंबई : कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर लवकरच मोफत वायफाय सेवा सुरू होणार आहे. याआधी रत्नागिरी, मडगाव, चिपळूण, कुडाळ येथे सेवा सुरु आहे. आता आणखी काही स्टेशनवर ही सुविधा सुरु होत असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले. ही सेवा देण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे.

नव्याने मोफत वायफाय सेवा कोलाड ते मडुरे दरम्यानच्या स्थानकांवर सुरु होणार आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल. सिस्कॉन, जॉयस्टरने ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कंपनी सामाजिक दायित्व निधी म्हणजेच सीएसआर फंडातून ही सेवा पुरवणार आहे. ही सेवा 21 मेपासून सुरु होणार आहे.

स्टेशनचे प्रवेशद्वार आणि स्टेशनचा अंतर्गत परिसर यामध्ये वायफाय उपलब्ध असेल. जॉयस्टरचे मोबाईल अॅप तुम्हाला मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. अॅपमध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर नोंदवल्यानंतर तुम्हाला वन टाईम पासवर्ड मिळेल. ओटीपीची नोंद केल्यानंतर तुम्ही वायफाय वापरणं सुरू करू शकाल. त्यानंतर तुम्हाला 2 एमबीपीएस पर्यंत इंटरनेट स्पीड मिळू शकेल.

कमीतकमी 100 आणि जास्तीत जास्त 300 लोक एकाचवेळी वायफाय वापरु शकतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क प्रमुख एल. के. शर्मा यांनी दिली.