...तिनं शौचालयासाठी मंगळसूत्र विकलं, पंकजा मुंडेंकडून कौतुक

घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडलीय. सौभाग्याच्या लेण्यापेक्षाही जास्त महत्त्व तिनं शौचालयाला दिलंय. यामुळेच, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्व:खर्चानं मंगळसूत्र देऊन या महिलेच्या क्रांतीकारी पावलाचं कौतुक केलंय. 

Updated: Nov 6, 2014, 10:24 PM IST
...तिनं शौचालयासाठी मंगळसूत्र विकलं, पंकजा मुंडेंकडून कौतुक title=

मुंबई : घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडलीय. सौभाग्याच्या लेण्यापेक्षाही जास्त महत्त्व तिनं शौचालयाला दिलंय. यामुळेच, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्व:खर्चानं मंगळसूत्र देऊन या महिलेच्या क्रांतीकारी पावलाचं कौतुक केलंय. 

संगीता आव्हाळे असं या महिलेचं नाव आहे. वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातल्या सायखेडा गावात त्या राहतात... मात्र, त्यांनी जो नवा आदर्श घालून दिलाय, त्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

आपल्या सासरी शौचालय नसल्यानं संगीताच्या कुटुंबीयांना शौचासाठी उघड्यावर जावं लागायचं... त्यातच मुलगी देखील 11 वर्षांची झाल्यानं संगीताची कुचंबणा आणखी वाढली. तिनं शौचालय बांधण्याचं ठरवलं. एवढंच नाही तर पैसे कमी पडले म्हणून तिनं चक्क आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र विकून टाकलं.

संगीता आव्हाळेनं एक मोठं क्रांतीकारी पाऊल उचललं. शौचालय बांधण्यासाठी तिनं घेतलेल्या पुढाकाराचं जोरदार कौतुक होतंय. राज्याच्या नव्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही संगीताच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. एवढंच नव्हे पंकजा मुंडेंनी स्वखर्चाने संगीताला नवं मंगळसूत्र बनवून दिलं.

संगीताच्या या सामाजिक जाणिवेनं सरकारला देखील जाग आलीय. ग्रामीण भागात जास्तीत जास्त शौचालये वर्षभरात बांधण्यात येतील, अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिलीय.

‘पहले शौचालय, फिर देवालय...’ अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती. संगीतासारख्या महिलांमुळं हा विचार अगदी खेड्यापाड्यातही रूजतोय, ही मोठी समाधानाची बाब म्हणायला हवी.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.