कल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती?

'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

Updated: Oct 24, 2015, 11:31 PM IST
कल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती? title=

कल्याण : 'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

'एकहाती सत्ता द्या, ५ वर्षात काम करुन दाखवतो नाही तर पुन्हा कधी केडीएमसी निवडणूक लढवणार नाही' असं आवाहन राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीकरांना केलं खरं... मात्र कल्याण डोंबिवलीकर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला एक हाती सत्ता कशी देतील हाच मुद्दा आता निवडणूकीत चर्चेचा मुद्दा ठरलाय. 

कारण, जेव्हा मनसेची हवा होती तेव्हा २०१० साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीला मनसेने सर्व १०७ जागांवर निवडणूक लढवली होती... आणि आता १२२ जागांपैकी फक्त ८७ ठिकाणी मनसे निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे स्थानिक मनसे पदाधिका-यांना भाजप सोबत सत्तेची स्वप्न पडत असल्याने मनसेने कल्याण डोंबिवलीत जवळपास १० जागांवर छुपी युती करत कमकुवत उमेदवार दिलेत. शिवाय २७ गावातील २१ प्रभागांपैकी फक्त ३ जागांवर मनसेने उमेदवार उभे केलेत. तर १० ठिकाणी संघर्ष समिती सोबत मनसेने भाजपला जाहीर पांठिबा दिलाय. शिवाय संघर्ष समितीच्या ५ उमेदवारांना देखील मनसेने जाहीर पाठिंबा घोषित केलाय. 

असं असतानाही मनसेच्या नेत्यांनी भाजपची असलेली छुपी युती अमान्य करत एक हाती सत्ता मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. मनसे आणि भाजपच्या या छुप्या युतीचा गाजावाजा झाल्याने भाजपला डोकेदुखी झालीय... तर दुसरीकडे भाजपचे नेते देखील या छुप्या युतीचा साफ इंकार करत आहे 

एक हाती सत्तेसाठी घोषणा वजा गर्जना झाली खरी मात्र आता सत्तेपासून लांब राहणं परवडणारं नसल्याने मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांत कुरबूर सुरु आहे. अशातच मनसेच्या इंजीनाला भाजपच्या यार्डात जागा मिळेल यासाठीच खालच्या पातळीवर ही छुपी युती केल्याचे बोलले जात आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.