उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न

'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.

Updated: Dec 23, 2015, 01:46 PM IST
उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न  title=

सोलापूर : 'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.

एकदा नाही तर दोनदा या महिलेनं आपल्याच शरीराचा अंश असलेल्या आपल्या चिमुरड्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. सविता असं या महिलेचं नाव आहे. सवितानं एमएपर्यंत शिक्षण घेतलंय. 

पहिल्यांदा सवितानं आपल्या बाळाला विष पाजलं. या घटनेनंतर बाळ कसं बसं बरं होत असताना सवितानं पुन्हा एकदा बाळाला हॉस्पिटलमधून निर्जन स्थळी नेलं.. आणि तिथं त्याला दगडानं मारण्याचा प्रयत्न केला...

परंतु, दैव बलवत्तर म्हणून हा सारा प्रकार काही महिलांनी पाहिला... या महिलांनी आरडाओरड केल्यानं सवितानं तिथून पळ काढला.

या महिलांनी जखमी चिमुरड्याला पोलीस ठाण्यात नेलं आणि पुन्हा एकदा देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय साऱ्यांना आला.

विशेष म्हणजे, रस्त्यावर रडत बसल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सविताला याच पोलीस स्टेशनमध्ये आणलं. त्यावेळी तिथं बाळाला वाचवणाऱ्या महिलांनी तिला ओळखलं आणि पोलिसांनी सविताला अटक केलीय. मात्र, सवितानं हे पाऊल का उचचलं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.