नयना पुजारी हत्याकांडातील तीन दोषींना फाशीची शिक्षा

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Updated: May 9, 2017, 05:53 PM IST
नयना पुजारी हत्याकांडातील तीन दोषींना फाशीची शिक्षा  title=

पुणे : पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं या तिघांना कालच दोषी ठरवलं होतं. मात्र, त्यांच्या शिक्षेचा फैसला आज करण्यात आला. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व आरोपींना कोर्टात आणण्यात आलं. विशेष कोर्टानं योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर यांना कालच या प्रकरणी दोषी ठरवलं होतं.

काय आहे प्रकरण

घटनेच्या दिवशी म्हणजेच ८ ऑक्टोबर २००८ रोजी सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या नयनाला लिफ्टच्या बहाण्याने आरोपींनी बस स्टॉपवरून आपल्या गाडीत घेतले. कॅब चालक  योगेश राऊत (२९ वर्ष) याच्या गाडीत अगोदरपासूनच राऊत याचे दोन मित्र महेश ठाकूर (२६ वर्ष), आणि विश्वास कदम (२७ वर्ष) हेदेखील त्या गाडीत होते. 

आरोपींनी नयनाला योग्य स्थळी सोडणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींनी तिचे अपहरण केले. तिला विवस्त्र करून पाच तास त्याच अवस्थेत कारमध्ये फिरवले. आरोपींनी तिच्यावर तीन वेळा बलात्कार केला. नयना मदतीसाठी याचना करत होती. मात्र, आरोपी ही घटना एन्जॉय करत होते. बलात्कारानंतर त्यांनी तिच्यासमोरच जेवणही केले. ही घटना उघडकीस येऊ नये, यासाठी आरोपींनी तिचा गळा आवळला व तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची पर्स, पाकीट, सोन्याच्या बांगड्या घेऊन आरोपी पसार झाले.

३०२ : खून करणे, ३६६ : अपहरण करणे, ३७६(ग) : सामूहिक बलात्कार, ४०४ : मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, १२०(ब) : कट रचणे, ३९७ : जबरी चोरी या कलमांखाली तिन्ही आरोपी दोषी आढळले. तर चौथा आरोपी राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार बनला.