औरंगाबादच्या सोमनाथची 'चार्ली चॅप्लीन'ला अनोखी श्रद्धांजली

चार्ली चॅप्लीन... आपल्या मुकाभिनयानं सर्वांना पोट धरून हसायला लावणारा खरा हास्यसम्राट... याच चार्लीची आज ३७ वी पुण्यतिथी... यानिमित्तानं औरंगाबादमधल्या ज्युनिअर चार्ली चॅप्लीननं, हास्यरसाच्या महानायकाला अनोखी श्रद्धांजली वाहिली... 

Updated: Dec 25, 2014, 11:09 AM IST
औरंगाबादच्या सोमनाथची 'चार्ली चॅप्लीन'ला अनोखी श्रद्धांजली title=

औरंगाबाद : चार्ली चॅप्लीन... आपल्या मुकाभिनयानं सर्वांना पोट धरून हसायला लावणारा खरा हास्यसम्राट... याच चार्लीची आज ३७ वी पुण्यतिथी... यानिमित्तानं औरंगाबादमधल्या ज्युनिअर चार्ली चॅप्लीननं, हास्यरसाच्या महानायकाला अनोखी श्रद्धांजली वाहिली... 

चार्ली चॅप्लीनच्या वेशभूषेत आणि त्याच थाटात वावरणाऱ्या ज्युनियर चॅप्लीनचं नाव आहे सोमनाथ स्वभावने... नाना चिंतांनी ग्रासलेल्या आणि तणावाखाली वावरणाऱ्यांना दोन घटका निखळ हसायला लावणं, हाच सोमनाथ स्वभावने यांचा स्थायीभाव बनलाय. 

चार्ली चॅप्लीनप्रमाणेच सोमनाथ यांचंही लहानपण, बिकट हालअपेष्टांमध्ये गेलं हे एक विचित्र साम्यच. चार्ली चॅप्लीनलाच आदर्श मानलेले सोमनाथ स्वभावने, अक्षरशः चार्लीच्या प्रेमात आहेत. म्हणूनच की काय गेली १० वर्षं चॅप्लीनच्या मुकाभिनयाद्वारे, सोमनाथ लोकांना हसवण्याचा वसा निष्ठेनं पार पाडताहेत. 

मात्र, मनोरंजन करतानाच सामाजिक संदेश देत लोकांमध्ये, जागरुकता निर्माण करण्याचा हेतूही सोमनाथ अचूक साधतात. व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला हा ज्युनिअर चार्ली आवर्जून देतो. तर व्यायामानं शरीर कमवा हा लाखमोलाचा संदेशही दिला जातो. रस्त्यावरचा कचरा पाहून हा चार्ली रडायला लागतो. तसंच लहान मुलांच्या हातात मोबाईल पाहून, आपल्या अनोख्या अंदाजात हा चार्ली त्यांच्यावर रागावतो सुद्धा...
 
एखाद्या दुकानात जाऊन हा ज्युनिअर चार्ली अक्षरशः धम्माल उडवून देतो. आपल्या अफलातून सायकलीवरुन शहराचा फेरफटका मारण्याची चार्लीची कसरत म्हणजे गंमतीशीर प्रकारच... 
 
एरवी चार्लीच्या वेशभूषेत असताना तोंडातून चकार शब्दही न काढणाऱ्या सोमनाथ स्वभावने, या भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या आयुष्यावर चार्लीच्या प्रभाव असल्याचं सांगतात. यावेळी मात्र ते भरभरून बोलतात.

२५ डिसेंबर १९७७ या दिवशी चार्ली चॅप्लीननं या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न सोमनाथ यांनी झी 24 तासच्या माध्यमातून केला. सर्वांच्याच लाडक्या चार्ली चॅप्लीनला त्याच्या पुण्यतिथीनिमित्त 'झी २४ तास'चीही आदरांजली... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.