शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...

साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय. 

Updated: Feb 25, 2015, 08:56 PM IST
शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...  title=

अहमदनगर : साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय. 

अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे जिल्हा परिषद शाळेत पहिलीत विक्रम सानप हा सहा वर्षीय मुलगा शिकतोय. वर्गातील बेंचवर पेनाची शाई सांडून ती शाई शिक्षिकेच्या साडीला लागली. या कारणावरून अनिता जाधव या शिक्षिकेने विक्रमला काठीच्या सहाय्याने मारहाण केली. विक्रमच्या पाठीवर आणि पायावर चांगलेच वळ उमटले. ही घटना विक्रमच्या आई-वडिलांना कळली तेव्हा त्यांनी थेट संगमनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. 

दरम्यान, सहा वर्षांच्या विक्रमला एवढी जबर मारहाण होऊनही घडलेली घटना गंभीर नसल्याचे सांगत वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं बेजबाबदारपणाचं वक्तव्य पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील यांनी केलंय. 

तर, दुसरीकडे शिक्षिकेने केलेली मारहाण अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत तसा अहवाल पाठवून योग्य ती कारवाई करणार असल्याचं तळेगाव दिघे जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्याध्यापिका मंदाकिनी माळवे यांनी सांगितलंय. 

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकच चिमुरड्यांना अमानुषपणे मारहाण करत असतील तर शिक्षकांकडून कोणता आदर्श घ्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.