पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

Updated: May 24, 2017, 08:17 AM IST
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात title=

मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

पनवेलमध्ये तिरंगी रस्सीखेच

एकूण 78 जागांसाठी हे मतदान होतंय.  570 मतदान केंद्रांवर 4 लाख 25 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पनवेलचे मतदार 418 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. शिवसेना, भाजप, महाआघाडी अशी तिरंगी रस्सीखेच या निवडणुकीत पाहायला मिळाली. मनसेही निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण खरी लढत या तीन पक्षातच होणार हे स्पष्ट आहे. प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री, आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी प्रचार सभा घेतल्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. 

भिवंडीत सुरक्षेसाठी ड्रोनचाही वापर

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या 90 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय. या निवडणुकीत 460 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत. 644 मतदान केंद्रावर जवळपास 4 लाख 80 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदानाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आलाय. गावगुंडावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाकाबंदी करण्यात आलीय. तब्बल ४३ सराईत गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आलाय. संवेदनशील केंद्र आणि बुथच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. प्रसंगी सुरक्षेसाठी ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे. २६ तारखेला मजमोजणी आहे. मात्र मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आलीय.

मालेगावात कडेकोट बंदोबस्त

मालेगाव पालिकेच्या निवडणुकीसाठीही मतदानाला सुरुवात झालीय. एका जागी बिनविरोध निवड झाल्याने पालिकेच्या 84 पैकी 83 जागांसाठी हे मतदान होतंय. 374 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला मालेगावचे मतदार करतील. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. इथल्या मतदान प्रक्रियेवर ड्रोनची करडी नजर राहणार आहे. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगावमध्ये निवडणुकीच्यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात चार ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा राबविली जाणार आहे.  राज्यात पहिल्यांदाच निवडणुकीसाठी ड्रोनचं वापर केला जाणार आहे.जवळपास अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आलाय.