पाहा नेमका कधी येणार पाऊस?

अवघ्या देशातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाचा मागमूस कुठेच दिसत नाहीय, ये बाबा दोन दिवसांनी का येत नाही, अशी आशा शेतकरी ठेऊन आहेत. कारण दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर कोवळं पिक कोमेजून जाणार आहे, आणि पाऊस आल्यावर नव्याने पेरणी करावी लागणार आहे.

Updated: Jul 5, 2015, 10:57 PM IST
पाहा नेमका कधी येणार पाऊस? title=

पुणे : अवघ्या देशातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाचा मागमूस कुठेच दिसत नाहीय, ये बाबा दोन दिवसांनी का येत नाही, अशी आशा शेतकरी ठेऊन आहेत. कारण दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर कोवळं पिक कोमेजून जाणार आहे, आणि पाऊस आल्यावर नव्याने पेरणी करावी लागणार आहे.

जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या पावसाने जून महिन्यात चांगलीच सलामी दिली होती. पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या उष्ण कटिबंधीय वादळांमुळे नैऋत्य मान्सून क्षीण झाला आहे. त्यामुळे देशभरात १४ जुलैनंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर येत्या ७ जुलैपासून महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केलीय.

स्कायमेटच्या मते, पश्चिम प्रशांत महासागरात सध्या तीन उष्णकटिबंधीय वादळे सक्रिय आहेत. लिन्फा, चान-होम आणि नांगका अशी या वादळांची नावे आहेत. 

पुणे वेधशाळेचा अंदाज
५ आणि  ६ जुलै : मराठवाडा कोरडा. विदर्भात तुरळक पाऊस
७ जुलै : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पाऊस
८ जुलै : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस

लिन्फा वादळ
यापैकी लिन्फा हे वादळ येत्या २४ तासांत फिलिपाइन्सच्या उत्तर किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. तर चान-होम वादळ मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता असून ते ५ ते ६ दिवसांत फिलिपाइन्स ते चीन ते कोरियाचा किनारा असा प्रवास करण्याची शक्यता आहे. 

चान-होम आणि नांगका
चान-होमच्या लगतच नांगका हे तिसरे वादळ निर्माण झाले आहे. या तीन वादळांमुळे शांघाय, कोरियाचा किनारा, जपानमध्ये वादळी वारे आणि जोरदार पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

मान्सूनवर परिणाम
या तिन्ही वादळांमुळे मान्सून क्षीण होणार आहे. ही वादळे ४ जुलै ते ११ जुलै या काळात पश्चिम प्रशांत महासागरात सक्रिय राहतील. त्यामुळे भारतात १४ जुलैनंतर मान्सूनला अनुकूल वातावरण राहील, असे स्कायमेटने स्पष्ट केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.