महिला दिन विशेष : वडखळच्या गॅरेजवाल्या प्रज्ञाताई

प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया आज ग्रामीण भागातही पाहायला मिळतात.  केवळ पतीच्या गॅरेजच्या व्यवसायात त्याला मदत नव्हे, तर स्वतःला गाडीखाली झोकून देऊन मेकॅनिक म्हणून काम करणा-या प्रज्ञाताई माने म्हणूनच आदर्शच ठरल्या आहेत. 

Updated: Mar 7, 2015, 09:13 PM IST
महिला दिन विशेष : वडखळच्या गॅरेजवाल्या प्रज्ञाताई title=

अलिबाग : प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया आज ग्रामीण भागातही पाहायला मिळतात.  केवळ पतीच्या गॅरेजच्या व्यवसायात त्याला मदत नव्हे, तर स्वतःला गाडीखाली झोकून देऊन मेकॅनिक म्हणून काम करणा-या प्रज्ञाताई माने म्हणूनच आदर्शच ठरल्या आहेत. 

 जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उद्धारी अशा शब्दांत स्त्रियांचा गौरव केला जातो. पण वडखळच्या प्रज्ञाताईंनी हातात पाना आणि पक्कड घेऊन आपल्या कुटुंबाच्या संसारगाड्याला भरभक्कम आधारही दिला आहे. प्रज्ञाताईंचे पती प्रदीप माने यांचं वडखळ, अलिबाग, जि. रायगड नाक्यावर गॅरेज आहे. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं ते एकमेव साधन. मात्र प्रदीप माने यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, पदरातली दोन मुलं आणि  संसारासाठी स्वतः प्रज्ञाताई धीरानं पुढे सरसावल्या. त्यांनी पतीकडून गॅरेज कामाची बारिकसारिक माहिती करून घेतली आणि आज त्या  आपल्या कामात वाकबगार झाल्यात.

त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करुन त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांचा मोठा मुलगा एस. टी. त मेकॅनिक आहे. तर दुसरा त्यांच्या कामात मदत करत पूर्णपणे या व्यवसायात उतरलाय. मुलं करती झाली म्हणून प्रज्ञाताईंनी आपलं काम सोडलेलं नाही. घरातली कामं सांभाळून त्या गॅरेजमध्येही आजही काम करतात. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रियांनी गगनभरारी घेतली आहे. प्रज्ञाताई त्यांपैकीच एक... त्यांचं आयुष्य सर्वांसाठी प्रेरणादायी असंच आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.