पावसाळी अधिवेशन होणार वादळी

Last Updated: Monday, July 9, 2012 - 16:29

www.24taas.com, मुंबई

 

अधिवेशनाच्या सोमवार या पहिल्याच दिवशी मंत्रालय आगीचा मुद्दा उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला जाईल अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. त्यामुळं विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरूवातीला आगीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

 

याशिवाय राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती आणि सरकारचं दुर्लक्ष, सिंचन अनुशेष-श्वेतपत्रिका, राज्यातल्या स्त्रीभ्रूण हत्या, तटकरेंची संपत्ती, आदर्श प्रकरणी सरकारने घेतलेली हरकत, टोलनाक्यावरील टोलवसूली, अपूर्ण धरण प्रकल्प, विविध खात्यांमधील भ्रष्टाचारांच्या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

 

तसंच गोदामात सडणारे धान्य, येरवडा तुरुंगात दहशतवाद्याची हत्या, बालसुधारगृहातील बलात्कार, मुंबई-पुण्यातील रेव्ह पार्टी, काविळसारख्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आलेलं अपयश, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, एसटी महामंडळातील भ्रष्टाचार, वाघांच्या हत्या यासह वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरंही विरोधक सरकारकडून घेणार आहे.

 

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत.त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

 

पावसाळी अधिवेशनाला सामोरं जाताना सरकारसमोर यावेळी विरोधकांचे कडवे आव्हान असणार आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 

व्हि़डिओ पाहा..

[jwplayer mediaid="135547"]

First Published: Monday, July 9, 2012 - 16:29
comments powered by Disqus