मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

Updated: Jun 22, 2012, 04:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

 

महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यावर मुख्यमंत्री बदलण्यात आले. आता मंत्रालयातील आगीचे प्रकरण हाताळण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले, म्हणून मुख्यमंत्री बदल हवा का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता  पवार यांनी शक्यता फेटाळून लावली.

 

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

 

आज दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार यांनी मंत्रालयाच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

मंत्रालयात काल जो अपघात झाला आहे, त्याबद्दल संशय घेण्याची परिस्थिथी सध्या नाही, या परिस्थितीतून आता पुर्ववत स्थिती कशी आणता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांशी मी चर्चा केली. माझ्याकडून मी दोन प्रस्ताव त्यांना दिले. एक म्हणजे तातडीची व्यवस्था आणि दुसरी कायम स्वरूपाची योजना करावी असे सांगितले आहे. तातडीच्या व्यवस्थेत येत्या ४८ तासात सर्व प्रशासकीय यंत्रणा सुरू झालेलं आहे, हे लोकांना दिसलं पाहिजे. तातडीचे उपाययोजना करण्यासाठी जागेचा प्रश्न मोठा आहे. जीटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम तयार आहे. एअर इंडियाच्या इमारतीत काही ऑफिस रिकामे आहेत. अजून आजूबाजूला जागा रिकाम्या आहेत. तसेच माननीय विधीमंडळ अध्यक्ष आणि सभापतींची परवानगी घेऊन विधीमंडळातील चेंबर वापरण्याची परवानगी घ्यावी. ही झाली तातडीची यंत्रणा पण कायम स्वरूपी योजना करणेही गरजेचे आहे.

 

कायम स्वरूपी योजनेचे उपाय योजना करताना महाराष्ट्र सरकार आणि खासगी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून मंत्रालयाच्या वास्तुची चौकशी करणं गरजेचं आहे. या वास्तुला ५० वर्षांपेक्षा अधिकचा कालखंड झालेला आहे. काल केंद्राच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या लोकांशी मी चर्चा केली. त्यांनी मंत्रालयाच्या वास्तुची पाहणी न करता सांगितले, की कोणत्याही इमारतीत ६ ते ८ तास आग लागली तर त्यात बेसिक डिफेक्ट आहे, हे लक्षात येते. त्यात तुम्हाला दीर्घकालाचा विचार करावाच लागेल. पण आम्ही बघितल्याशिवाय सांगणार नाही. आम्ही आमच्या अनुभवावरून सांगत आहोत, डिजास्टर मॅनेजमेंटच्या लोकांनी स्पष्ट केल्याचे पवार यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या आर्किटेक्चरांची चर्चा करावी आणि दीर्घकालीन नियोजन कसे करावे, याचा विचार करावा, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.