सावधान, लिफ्ट देणं तुमच्या जीवावर बेतू शकत!

तुम्ही कारने जात आहात अथवा मोटार सायकलने जात असाल तर कोणी लिप्ट मागितली तर ती देऊ नका. तुमची दया तुमच्या जीवावर बेतू शकते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तसेच नवी मुंबईत असे प्रकार घडले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून लूटणारी टोळी सक्रीय आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी अटक केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 11, 2013, 09:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
तुम्ही कारने जात आहात अथवा मोटार सायकलने जात असाल तर कोणी लिप्ट मागितली तर ती देऊ नका. तुमची दया तुमच्या जीवावर बेतू शकते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तसेच नवी मुंबईत असे प्रकार घडले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून लूटणारी टोळी सक्रीय आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी अटक केलेय.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवाशांना लिफ्ट देत लुटणारे तसेच भाड्याने गाडी घेऊन चालकाला मारहाण करीत धुमाकूळ घालणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. या प्रकरणी चौघांना अटक झाली असून, त्यांच्याकडून पिस्तुलासह ११ लाख ९३ हजार रु पये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. मीरारोड-काशिमिरासह ठाणे जिल्ह्यातील ७ तर राज्यातील २१ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
कुलजीत राम बक्षी (३०), अशोक राकेश उपाध्याय (२८), तेजस रामदास वाकोडे (२४), पवनकुमार श्यामलाल कनोजिया (१९) या चार जणांना पोलिसांनी अटक केली. काही जण पिस्तुल, चाकूचा धाक दाखवत महामार्गावर लूटमार करीत असल्याच्या तक्रारी ठाणे पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.
अटक केलेल्या लुटमार टोळीतील सदस्यांनी चौकशीदरम्यान ठाणे जिल्ह्यातील सात गुन्ह्यांसह राज्यातील २१ गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तुल, चाकू तसेच ११ लाख ९३ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाइल, घड्याळ, दोन कार हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.