राज ठाकरे- बिग बी यांच्यात समेट

बिग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात समेट झाली असून येत्या सोमवारी मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात बिग बी उपस्थित राहणार आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 20, 2013, 01:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात समेट झाली असून येत्या सोमवारी मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात बिग बी उपस्थित राहणार आहेत.
पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि बिग बी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तो आता संपताना दिसत आहे. २००८ मध्ये झालेल्या वादावर दोघांनी पडदा टाकला आहे. शतकाचे महानायक मनसेच्या चित्रपट सेनेच्या सातव्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून येत्या सोमवारी षण्मुखानंद येथे उपस्थित राहणार आहे.
भारतीय सिनेमाच्या १०० वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी मनसे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रांतील दिग्गज येणार आहेत.
५ वर्षांपूर्वी एकाच मंचावर होते बिग बी आणि राज
राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार असे नाही. यापूर्वी २००८ मध्ये राज ठाकरे यांनी आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फोटोबायोग्राफी प्रकाशित केली, त्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन यांना बोलावण्यात आले होते. त्या वेळी राज ठाकरे शिवसेनेत होते.
कसा सुरू झाला वाद
२००८ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरे यांनी आपला स्वतःचा पक्ष काढला. मराठी वि. उत्तर भारतीय असा संघर्ष सुरू झाला. यामुळे बच्चन कुटुंबिय आणि राज ठाकरे यांच्यात दरी वाढण्यात सुरूवात झाली. फेब्रुवारी २००८मध्ये एका भाषणात राज ठाकरे यंनी बिग बी यांच्यावर सरळ तोफ डागत म्हटले की, अमिताभ बच्चन महाराष्ट्रात काम करतात, इथेच राहतात आणि ब्रँड अँबेसेडर उत्तर प्रदेशाचे बनतात. तर माझं काय चुकलं की मी माझ्या महाराष्ट्रावर प्रेम करतो. राज ठाकरेंचे हे भाषण अमिताभच्या त्या भाषणाचे उत्तर होते, जे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये दिले होते. ते म्हणाले होते की, मी कुठेही राहिलो तरी मी कायम ‘छोरा गंगा किनारेवाला’ राहणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.