तुरुंगात कैद्यांचा मृत्यू अधिकाऱ्यांना भोवणार

यापुढे तुरुंगात एकाही कैद्याचा मृत्यू झाल्यास अधिकाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. 

Updated: Dec 9, 2015, 12:09 PM IST
तुरुंगात कैद्यांचा मृत्यू अधिकाऱ्यांना भोवणार title=

मुंबई : यापुढे तुरुंगात एकाही कैद्याचा मृत्यू झाल्यास अधिकाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. 

तुरुंगात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास कोणत्याही चौकशी किंवा तपासाविना संबंधित अधिकाऱ्यांना थेट निलंबित करा... आणि नंतरच चौकशी करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

तुरुंगात कैद्यांचा मृत्यू होणं, यापुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने या विरोधात योग्य ते पावले उचलावीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. शिवाय पोलीस महासंचालकांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती बनवून पुढील ६ महिन्यात जेल मध्ये कैद्यांचे होणारे मृत्यू शून्यावर कसे येतील याबाबत तात्काळ कामाला लागावे, असेही आदेश न्यायालयाने दिलेत. 

२०१४ साली वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यातील एग्नेलो वल्दारीस या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून सीबीआयचा तपास पूर्ण होवून त्यांनी अहवाल सादर केला नाही. यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार एग्नेलो याला पोलिसांनी सोन्याची चैन चोरल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं... पण, नंतर तो पोलिसांच्या तावडीतून सुटून पळत असताना त्याचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला होता.

तर, एग्नेलो याला आणि त्याच्याबरोबर इतर दोघांना वडाळा जीआरपीने खोट्या प्रकरणात ताब्यात घेतले आणि त्यांचा लैंगिक छळदेखील केला... अतोनात हाल केल्यानंतर एग्नेलो याचा मृत्यू झाला.... पण हे लपवण्यासाठी पोलिसांनी एग्नेलोचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला आणि अपघाती मृत्यू झाला अशी नोंद केली, असा आरोप एग्नेलोच्या वडिलांनी केलाय. 

त्यानुसार तपास केला गेला पण पोलीस करत असलेल्या तपासात त्रुटी आढळल्या. त्यामुळे एग्नेलो प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.