आघाडीचा निर्णय लांबणीवर

संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.

Updated: Jan 8, 2012, 12:13 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.

 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडलाय. शनिवारी दिवसभर चाललेल्या बैठका आणि चर्चांनंतरही आघाडीचा निर्णय होऊ शकला नाही. राष्ट्रवादीशी आघाडी होऊ नये अशी आग्रही भूमिका काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी घेतली होती. कामतांनी याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहलं होतं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी आपल्या समर्थकांबरोबर पुढच्या रणनितीवर चर्चाही केली. कॅमेऱ्यासमोर मात्र ते बोलण्यास तयार नव्हते.

 

गुरुदास कामतांच्या वेगळ्या भूमिकेची मात्र नंतर काँग्रेस नेत्यांनी दखल घेतली. संध्याकाळी कामत यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्षावर बैठकीसाठी पाचारण केलं. यावेळी काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यानंतरच आघाडीचा निर्णय होईल असा निर्णय झाला आहे.

 

रविवारी आणि सोमवारी मुख्यमंत्री जिल्हानिहाय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच आघाडीच्या निर्णय अपेक्षित आहे. तुर्तास आघाडीचा निर्णय सोमवारपर्यंत लांबल्याचं निश्चित झालं आहे.