जे पटत नाही त्यावर टीका करणारच : उद्धव ठाकरे

शिवसेना आणि भाजप युतीमधील वाद मिटेल की नाही हे माहीत नाही. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर टीका करणारच, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

Updated: Jun 30, 2016, 03:12 PM IST
जे पटत नाही त्यावर टीका करणारच : उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेना आणि भाजप युतीमधील वाद मिटेल की नाही हे माहीत नाही. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर टीका करणारच, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये सध्या संबंध कमालीचे टोकाला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज दुपारी राज्याचे अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याचवेळी त्यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. 
 
वनमंत्रालयाने राज्यात एक जुलैला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट जवळपास सव्वा तास चालली. मात्र, भेटीचा अधिक तपशील समजू शकलेला नाही.

दरम्यान, वृक्षारोपण कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. त्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव यांनी स्वीकारले आहे, अशी माहिती सुधीर मनुगंटीवार यांनी दिली.

युतीत काय घडलंय-बिघडलंय ?

- शिवसेना-भाजपमधील तणाव कमालीचा वाढला. कारण शिवसेनेकडून होत असलेल्या आंदोलनांमुळे भाजप अध्यक्ष अमित शहा संतापले आहेत. ‘सामना’ जाळण्याच्या मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या वक्तव्यामुळे आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या ‘मनोगत’मधील लेखामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही संतापलेत. भाजपने माफी मागितल्याशिवाय तडजोड करायची नाही, अशी शिवसेनेची भूमिका.

- ‘घटस्फोट कधी घेणार, सत्तेच्या ताटावरून कधी उठून जाणार,’ अशी भाषा भाजपने लेखात वापरल्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, हे दाखवून देण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारामध्येही शिवसेना सहभागी न होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांची माहिती. 

- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ‘निजामाच्या बापाचे सरकार’ या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तेव्हापासून भाजप नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

-‘मनोगत’मध्ये भांडारी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर आणि अ‍ॅड. शेलार यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेना कार्यकर्तेही बिथरले आणि आंदोलने केले.

- अमित शहा यांचा गब्बरसिंग असा उल्लेख करण्यात आल्याने शहा आणि भाजप नेतेही संतापले आहेत. शहा यांनी राज्यातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याशी यासंदर्भात चर्चा करून घडामोडींची माहितीही घेतल्याचे वृत्त. 
- शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये शहा, शेलार यांची वैयक्तिक निंदानालस्ती, जोडे मारणे असे प्रकार झाले. अ‍ॅड. शेलार यांनी ‘सामना’ जाळण्याची भाषा केल्याने शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तीव्र नाराजी व्यक्त केली.

- भंडारी यांच्या लेखानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ते वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शांततेचे आवाहन केल्याने भाजप नेतेही नाराज.