गडचिरोलीत नक्षली हल्ला; 7 जवान शहीद

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात नक्षलविरोधी दलाच्या कामांडरसह सात जवान शहीद झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 11, 2014, 03:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात नक्षलविरोधी दलाच्या कामांडरसह सात जवान शहीद झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत. चार्मोशी तालुक्यात घोट भागात पोलिसांच्या गस्ती पथकाची टाटा सूमो गाडी नक्षलवाद्यांनी उडवून दिली.
ही घटना सकाली 9.40 वाजल्याच्या सुमारास घडली. यावेळी, पोलीस अधिकारी जिल्ह्यातील चामोरशी तालुक्याच्या पावीमुरंदा आणि मुरमुरी गावांतल्या जंगलात सुरू असलेल्या आपल्या अभियानासाठी जात होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले सर्व पोलीस महाराष्ट्राच्या विशेष सी-60 नक्षलविरोधी अभियान दलाचे सैनिक होते. मुरमुरी-चामुरीमधून त्यांचं वाहन जात असतानाच हा भूसुरुंग घडवण्यात आला. सुरुंग स्फोटानंतर पोलीस आणि माओवाद्यांमध्ये गोळीबारही झाला. सुनील मादवी, रोहन दंबाडे, सुभाष कुमरे, दुर्योधन नाकतोडे, तिरुपती आलम, लक्ष्मण मुंडे (सुमो चालक) अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत तर जखमींना हवाई मदतीनं नागपूरला आणलं गेलं.
दोन दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठातला प्राध्यापक साईबाबा याला नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक झाली होती. त्याला काल चंद्रपूरमध्ये पोलीस कोठडी देण्यात आलीय. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षल्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.