दुष्काळाने पळवली साखर!

राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 26, 2013, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय. तसंच आगामी वर्षातही साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.
दुष्काळानं राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी तर पळवलं आहेच. शिवाय या भयाण दुष्काळामुळं अन्न-धान्याच्या उत्पादनात मोठी घट झालीय. पावसानं दगा दिल्यामुळं खरीप आणि रब्बी पिकं जिथं पूर्णत: वाया गेली, तिथं भरपूर पाणी पिणा-या ऊस पिकाची काय अवस्था. 2011-12 या हंगामात 771 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन 89.96 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. परंतु दुष्काळामुळे 2012-13 या हंगामात 700 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन 79.90 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झालंय. म्हणजे सुमारे 10 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन कमी झालंय.
कोल्हापूर आणि नागपूर झोनमध्ये साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी दुष्काळामुळं पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड आणि अमरावती या झोनमधील साखरेच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झालीय. दुष्काळी भागात पाणी नसल्यामुळं यंदा ऊसाची नवीन लागण झालेली नाही. तसंच यावर्षीचे खोडवा पिकही निघाल्यामुळं पुढील हंगामातही साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
पैसा मिळवून देणारं पिक म्हणून ऊसाची ओळख आहे. परंतु पाणी टंचाईमुळं ऊसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळं शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.