‘एनटीपीसी’ची दादागिरी चालणार नाही!

सोलापुरातल्या होटगी परिसरात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पाचं बांधकाम अवैध असून या बांधकामाला ग्रामपंचायतीनं हरकत घेतलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 4, 2013, 07:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापुरातल्या होटगी परिसरात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पाचं बांधकाम अवैध असून या बांधकामाला ग्रामपंचायतीनं हरकत घेतलीय. त्यामुळं प्रगती पथावर असलेल्या एनटीपीसीच्या बांधकामाला खीळ बसण्याची शक्यता आहे.
तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या ‘एनटीपीसी’च्यावतीनं औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आला. त्यासाठी सोलापुरातल्या होटगी, आहेरवाडी आणि फताटेवाडी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जवळपास १९२२ एकर शेतीजमिनी चार टप्यात संपादित करून अधिग्रहितही करण्यात आल्या. गावात नवीन प्रकल्प येईल या आशावादामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोधही केला नाही. आणि आपल्या जमिनी दिल्या. मात्र, एनटीपीसीनं पुर्नवसनाला प्राधान्य न देता प्रकल्पाचं बांधकाम सुरू केलंय. यासंदर्भात ग्रामपंचायतीची परवानगी घेणं गरजेचं होतं. मात्र, एनटीपीसी याकडं साफ दुर्लक्ष करतंय. त्यामुळं एनटीपीसीच्या क्षेत्रातल्या ग्रामपंचायतींनी बांधकामाला हरकत घेतलीय.

शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून लवकरच तपासणी करून त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. एनटीपीसी प्राधिकरणाला १७ जूनपर्यंत पुनर्वसन करा अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं आता यावर एनटीपीसी प्राधिकरण काय निर्णय घेतं याकडं प्रकल्पग्रस्तांचं लक्ष लागलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.