'धोनीसाठी जिंकणं-हरणं नाही तर केवळ ब्रँड-पैसा महत्त्वाचा'

महेंद्रसिंग धोनीसाठी केवळ ब्रँड आणि पैसाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्यानं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची मनं दुखावलीत, अशी घणाघाती टीका प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक टॉम ऑल्टर यानं केलीय.

Updated: Jan 1, 2015, 08:32 PM IST
'धोनीसाठी जिंकणं-हरणं नाही तर केवळ ब्रँड-पैसा महत्त्वाचा'  title=

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीसाठी केवळ ब्रँड आणि पैसाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्यानं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची मनं दुखावलीत, अशी घणाघाती टीका प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक टॉम ऑल्टर यानं केलीय.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यानं अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे अनेकांना धक्काच बसला... त्यानंतर चर्चेचं एक सत्रच सुरू झालं. काहींनी धोनीच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, काहींनी हा त्याचा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगत प्रतिक्रिया देणं टाळलं तर काहींनी धोनीच्या या निर्णयावर टीका केली.

याच मुद्द्यावर, अभिनेता, थिएटर कलाकार आणि क्रिकेट समीक्षक टॉम अल्टर यानंही उडी घेतलीय. यावेळी, त्यानं केवळ धोनीच्या निर्णयावरच नाही तर वैयक्तिकरित्या धोनीवर टीका केलीय. 

टॉम अल्टर हा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा पहिला व्हिडिओ इंटरव्ह्यू करणारा व्यक्ती म्हणूनही ओळखला जातो. 
 
'महेंद्र सिंग धोनीनं त्याला हटवलं जाण्यापूर्वीच कॅप्टन्सी सोडणं हा योग्य निर्णय नव्हता... त्यानं हे पाऊल मोठ्या अहंकारामधून उचललंय. त्याला त्याच्या इमेजवर ओव्हरकॉन्फिडन्स आहे. त्याच्यावर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कायमची बंदी घालण्यात यायला हवी' असं टॉम ऑल्टर यानं म्हटलंय.

इतकंच नाही, तर धोनीवर वैयक्तिक टीका करत टॉमनं 'धोनीनं केवळ करारच तोडलेला नाही तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांशी असलेलं पवित्र नातंही त्यानं तोडून टाकलंय... आणि धोनीला याची जराही जाणीव नाही. का? असं त्यानं केवळ यामुळे केलय कारण तो कॉर्पोरेट जगताचा लाडका आहे... मोठ्या बॉसेससोबत त्याची जवळिक आहे. त्याच्यासाठी जिंकणं किंवा हरणं महत्त्वाचं नाही... तर त्याच्यासाठी केवळ ब्रँड आणि पैसाच महत्त्वाचं आहे' असं म्हणत टॉम ऑल्टरनं धोनीवर घणाघाती टीका केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.