आयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला.

Updated: May 23, 2017, 05:40 PM IST
आयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला. यंदाच्या आयपीएलमध्ये सगळ्यांची नजर होती ती सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्सवर. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सनं स्टोक्सला 2.3 मिलियन डॉलरला विकत घेतलं. स्टोक्सनंही त्याच्या किंमतीला साजेसा खेळ करत पुण्याला फायनलमध्ये पोहोचवलं.

आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणारी रक्कम तर सगळ्यांनाच समजते पण टीमच्या प्रशिक्षक आणि मेंटरना मिळणाऱ्या रकमेबाबत मात्र गुप्तताच पाळण्यात येते. आयपीएलमध्ये मुंबईचा मेंटर सचिन तेंडुलकरला सर्वाधिक मानधन दिलं जातं तर या यादीमध्ये दिल्लीचा मेंटर राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं बोललं जातं.

दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम द्रविडला दरवर्षी 4.5 कोटी रुपये मानधन देतं. तर आरसीबीचा कोच डॅनिअल व्हिटोरी आणि केकेआरचा कोच जॅक कॅलिसला 3.5 कोटी रुपये मिळतात. पुण्याचा कोच स्टिफन फ्लेमिंग, हैदराबादचा टॉम मुडी आणि मुंबईचा कोच जयवर्धनेला प्रत्येक वर्षी 2.5 कोटी रुपये दिले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोच सेहवागला दरवर्षी 3 कोटी रुपये मिळतात. सगळ्यात कमी मानधन घेणाऱ्यांमध्ये ब्रॅड हॉजचा नंबर लागतो. हॉज दरवर्षी 70  लाख रुपयांचं मानधन घेतो. 

आयपीएलमध्ये कोचवर पैशांचा वर्षाव होत असला तरी भारतात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोचिंग करणाऱ्या कोचना मात्र तुटपुंज्या मानधनावर समाधान मानावं लागत आहे. रणजी टीमच्या कोचला एका वर्षासाठी जास्तीत जास्त 30 लाख रुपये मिळतात. तर नॅशनल क्रिकेट अकादमीच्या कोचना दिवसाला जास्तीत जास्त 8 हजार रुपये मिळू शकतात. यासाठी कोच भारतीय टीमचा माजी निवड समिती सदस्य असणं बंधनकारक आहे. अन्यथा या कोचला दिवसाला 4 ते 5 हजारांपर्यंतच मानधन मिळू शकतं.