लायसन्स नसेल तर विम्याची जबाबदारी वाहनमालकाचीच!

अपघातग्रस्त वाहनाच्या ड्रायव्हरकडे योग्य लायसन्स नसेल , तर विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी वीमा कंपनीची नाही तर वाहनमालकाची असल्याचा निर्णय ठाणे मोटार वाहन अपघात प्राधिकरणाने दिला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 13, 2013, 04:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
अपघातग्रस्त वाहनाच्या ड्रायव्हरकडे योग्य लायसन्स नसेल , तर विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी वीमा कंपनीची नाही तर वाहनमालकाची असल्याचा निर्णय ठाणे मोटार वाहन अपघात प्राधिकरणाने दिला आहे.
१७ फेब्रुवारी , २००८ रोजी काशिमीरा येथील एका सिग्नलजवळ ठाण्यातील मोटारसायकलस्वार रमेश एकनाथ कांबळे (३९) उभे होते. मागून येणाऱ्या एका टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कांबळे यांचा पाय जायबंदी झाला. या प्रकरणी टँकरचा मालक चंद्रकांत म्हात्रे आणि टँकरचा वीमा काढणाऱ्या नॅशनल इन्श्यूरन्स कंपनीवर नुकसानभरपाईचा दावा कांबळे यांनी केला होता.
अपघातग्रस्त टँकरचालकाकडे योग्य लायसन्स नव्हते , त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आमची नसल्याचा पवित्रा वीमा कंपनीने घेतला. हलक्या वाहनांचे लायसन्स असताना टँकरचालक अवजड वाहन चालवत होता , अशी माहिती आरटीओने प्राधिकरणाला दिली होती. त्यामुळे कंपनीचा दावा प्राधिकरणाने मान्य केला. परंतु , अशा प्रकरणांमध्ये अपघातग्रस्तास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वाहनमालकाची असल्याचे सांगत टँकरमालकाकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिले.
या प्रकरणी सुरुवातीला १२ लाख ६९ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. परंतु , या अपघातास दोन्ही वाहनचालक जबाबदार असल्याने , ती रक्कम ५० टक्के कमी करून म्हणजेच ६ लाख ३४ हजार रुपये सात टक्के वार्षिक व्याजासह कांबळे यांना देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.