दुरुस्ती केल्याने मुंबई पालिका प्रशसनाने शाळाच केली जमीनदोस्त

मुंबई महापालिकेनं कोणतीही नोटीस न देता, धारावीतली शाळा पाडल्यानं एकच खळबळ उडालीय. या शाळेत शिकणा-या ३०० विद्यार्थ्यांनी आता जायचं कुठं, असा सवाल संतप्त पालकांनी केलाय. पाडलेल्या शाळेची ही कहाणी.

Updated: Nov 6, 2014, 09:22 AM IST
दुरुस्ती केल्याने मुंबई पालिका प्रशसनाने शाळाच केली  जमीनदोस्त title=

मुंबई : मुंबई महापालिकेनं कोणतीही नोटीस न देता, धारावीतली शाळा पाडल्यानं एकच खळबळ उडालीय. या शाळेत शिकणा-या ३०० विद्यार्थ्यांनी आता जायचं कुठं, असा सवाल संतप्त पालकांनी केलाय. पाडलेल्या शाळेची ही कहाणी.

शाळांना सध्या दिवाळीची सुट्टी आहे. काही दिवसांतच सुट्टी संपून पुन्हा शाळा सुरू होतील. पण धारावीतल्या श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेतले विद्यार्थी पुन्हा शाळेत जाऊ शकणार नाहीत. कारण त्यांची शाळाच मुंबई महापालिकेनं बुलडोझर लावून गेल्या ३० ऑक्टोबरला पाडून टाकली.

संत कक्कय्या विकास संस्थेची ही शाळा १९६५ पासून अस्तित्वात आहेत. या शाळेच्या दुरुस्तीसाठी फेब्रुवारीपासून संस्थेनं महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पण महापालिकेनं कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर जुलै महिन्यात पाणीगळती होत असल्यानं शाळेनं दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि महापालिकेला तसं कळवलं. त्यावर महापालिकेनं काम थांबवण्याची नोटीस दिली. त्यानुसार शाळेनं काम थांबवलं आणि महापालिकेला कळवलं. मात्र त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कुठलीही पूर्वसूचना न देता महापालिकेनं थेट शाळाच पाडून टाकल्याचं संस्थाचालकांचं म्हणणं आहे.

या शाळेत सध्या अडीचशे ते तीनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. ही शाळा मागासवर्गीयांसाठी आहे, आणि तिथे मोफत शिक्षक दिला जात होता. महापालिकेच्या या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोपही केला जातोय.

धारावीमध्ये हजारो झोपड्या बेकायदेशीरपणे बांधलेल्या आहेत. त्या बेकायदा झोपड्या हटवण्याची कारवाई करायला मुंबई महापालिकेला वेळ नाही. शाळा पाडण्यासाठी मात्र पालिकेचे अधिकारी बुलडोझर घेऊन पोहोचले. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.