7 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कर्णधारचा इंटेरनॅशनल क्रिकेटला अलविदा!

Meg Lanning retirement : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मेग लॅनिंग हिनं वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Updated: Nov 9, 2023, 12:07 PM IST
7 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कर्णधारचा इंटेरनॅशनल क्रिकेटला अलविदा!  title=

जगभरात क्रिकेटचे आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे नगण्य चाहते आहेत. भारतात तर या खेळाडूंना देवाचा दर्जा दिला गेल्याचीही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पुरुष खेळाडूंप्रमाणे आता महिला क्रिकेटपटूंचेही बरेच चाहते होऊ लागले आहेत. महिला क्रिकेटचे सामने पाहण्यासाठीही चाहते प्रचंड गर्दी करतात. 

चाहत्यांच्या पसंतीची अशीच एक महिला क्रिकेटपटू म्हणजे मेग लॅनिंग.पण ऑस्ट्रेलियासाठी 241 मॅचेस खेळून 7 वेळा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या मेगनं अवघ्या 31व्या वर्षात इंटेरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. तिच्या या निर्णयानं तिचे चाहते चकित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल मेग लॅनिंग म्हणाली, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर होण्याचा निर्णय घेणे कठीण होते, परंतु मला वाटते की आता माझ्यासाठी योग्य वेळ आहे. 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा आनंद घेता आला यासाठी मी भाग्यवान आहे, परंतु मला माहित आहे की मला आता काहीतरी नवीन करण्यासाठी योग्य वेळ आहे.'

निवृत्तीचा हा सोहळा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयोजित करण्यात आला होता. तेव्हा कुटुंब आणि मित्रमंडळींसमोर  बोलताना लॅनिंगने सांगितले की, हा निर्णय तिने विचारपूर्वकच घेतला आहे. ती पुढे म्हणाली,' मला असे वाटते की आता माझ्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर साध्य करण्यासाठी काहीच उरले नाही.कोणत्याही गोष्टीत अपूर्णपणे सहभाग घेणे मला पटत नाही आणि त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.' 

हे सांगताना मात्र तिचे डोळे पाणावले होते. निवृत्ती सोहळ्याला हजेरी लावलेल्या तिच्या आई वडिलांना तिनं पाणावलेल्या डोळ्यांनीच धन्यवाद म्हंटलं. 

मेग लॅनिंगची कारकीर्द 

दोन एकदिवसीय विश्वचषक आणि पाच टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या लॅनिंगने 2010 मध्ये पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8,352 धावा केल्या. त्यात एकूण 17 शतके आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.
तिच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, लॅनिंगने वयाच्या १८ व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध नाबाद १०४ धावांची खेळी साकारली होती. असं करून मेग, आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारी सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली. हा एक विक्रम अजूनही तिच्या नावावर आहे.
लॅनिंगची 2014 मध्ये कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.  केवळ 21 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाची सर्वात तरुण कर्णधार बनण्याचा मान तिनं पटकावला. 182 सामन्यांमध्ये तिनं ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं, जे महिला क्रिकेटच्या इतिहासात  इतर कोणत्याही महिला खेळाडूंपेक्षा जास्त आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय संघांपैकी एकाला मागे सोडले.
लॅनिंगने फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2023 टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत खेळलेला सामना तिचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला.