'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 13, 2017, 05:51 PM IST
'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला. विराट-अनुष्काच्या लग्नानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण अमूल गर्लनं मात्र या दोघांना जरा हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

अमूलनं ट्विटरवरून या दोघांच्या कार्टूनबरोबर अमूल गर्लचं कार्टून शेअर करून अभिनंदन केलं आहे. 'कोहली सजाके रखना मेहेंदी लगाके रखना' असं कॅप्शन अमूलच्या या फोटोला देण्यात आलं आहे. तसंच अमूल गर्ल विराट-अनुष्काला प्लेटमध्ये ठेवलेलं बटर देताना दाखवण्यात आली आहे.

सब्यसांचीनं डिझाईन केले कपडे

११ डिसेंबरला विराट आणि अनुष्काचं इटलीच्या बोर्गो फिनोचीतो रिसॉर्टमध्ये लग्न झालं. विराट-अनुष्काचं कुटुंब आणि काही मित्र यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. हिंदी रिती-रिवाजांनुसार हे लग्न झालं. दोघांच्या लग्नाची थीम फ्लोरल होती. तर सब्यसांचीनं दोघांचे कपडे डिझाईन केले होते.

इकडे होणार रिसेप्शन

विराट आणि अनुष्काचं २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे. मुंबईतल्या रिसेप्शनला बॉलीवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंबरोबरच अन्य सेलिब्रिटींची उपस्थिती असेल. यानंतर अनुष्का शर्मा विराट कोहलीबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनुष्का परत भारतात येईल आणि शाहरुखसोबत नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. विराट आणि अनुष्का मुंबईतल्या वरळीच्या घरात राहणार आहेत. विराटनं मागच्याच वर्षी हे घर घेतलं होतं.