गोलंदाजाच्या '३६० डिग्री' स्टाईलमुळे फलंदाज चक्रावला अन्...

खेळाडुंनी पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

Updated: Nov 13, 2018, 09:27 PM IST
गोलंदाजाच्या '३६० डिग्री' स्टाईलमुळे फलंदाज चक्रावला अन्... title=

पाटणा: आतापर्यंत क्रिकेटविश्वात '३६० डिग्री' ही टर्म दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्ससाठी वापरली जायची. मैदानाच्या कोणत्याही भागात चेंडू टोलवायच्या त्याच्या कौशल्यामुळे त्याला 'मिस्टर ३६०' म्हणून ओळखले जाते.

मात्र, नायडू चषक स्पर्धेत नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश वि. पश्चिम बंगाल सामन्यात गोलंदाजाकडून '३६० डिग्री'चा वापर झालेला पाहायला मिळाला. 

या सामन्यात उत्तर प्रदेशाचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंह याने एक विचित्र चेंडू टाकला. रनअप पूर्ण करून स्टम्पजवळ आल्यानंतर त्याने स्वत:भोवती एक गिरकी घेऊन चेंडू टाकला. साहजिकच या विचित्र शैलीमुळे फलंदाज चक्रावला. मात्र, त्याने सावधपणे हा चेंडू खेळून काढला. अखेर पंचांनी हा चेंडू डेड बॉल ठरवला. 

त्यावेळी उत्तर प्रदेशच्या खेळाडुंनी पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. क्रिकेटच्या नियमात गोलंदाजीची ही शैली बसत नाही. केवळ फलंदाजाला विचलित करण्यासाठी शिवाने अशाप्रकारे चेंडू टाकला, असे पंच विनोद शेषन यांनी सांगितले. 

यानंतरही उत्तर प्रदेशचे खेळाडू आपला हेका सोडायला तयार नव्हते. मी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतो. मी केरळ विरुद्धच्या सामन्यात असाच चेंडू टाकला होता. तेव्हा पंचांनी आक्षेप घेतला नव्हता. फलंदाज नेहमी रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिट फटका मारतात. पण, जेव्हा गोलंदाज काही वेगळे करायला जातो, तेव्हा त्याचा चेंडू अवैध ठरविला जातो, असा प्रतिवाद शिवा सिंह याच्याकडून करण्यात आला.