टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव; 6 जणांना कोरोनाची लागण

 टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा फटका बसला आहे.

Updated: Jan 20, 2022, 09:26 AM IST
टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव; 6 जणांना कोरोनाची लागण title=

त्रिनिदाद : अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप सुरु असून टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. टीममध्ये कोरोनाने शिरकाव केला असून काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. टीमचा कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद आणि इतर 4 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यांना बुधवारीआयर्लंडविरुद्धच्या सामन्याला त्यांना मुकावं लागलं आहे.

यश धुल आणि शेख रशीद यांच्याशिवाय आराध्य यादव, वासू वत्स, मानव परख आणि सिद्धार्थ यादव यांनाही या कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया केवळ 11 खेळाडूंना खेळवू शकली.

कोरोनाबाधित खेळाडू क्वारंटाईन

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "भारतातील 3 खेळाडू यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना आधीच क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलं होतं. सामन्याच्या आधी सकाळी, आमचा कर्णधार आणि उपकर्णधार देखील रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटीव्ह आढळले."

11 इंडियन खेळाडू फीट

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे , "खबरदारी म्हणून त्यांना सामना खेळू दिला नाही. या खेळाडूंमध्ये कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद यांचाही समावेश आहे. आमच्याकडे फक्त 11 खेळाडू आहेत आणि 6 खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत."

यश धुल आणि शेख रशीद दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळले पण आराध्य यादव त्यावेळी सामन्याचा भाग नव्हता. धुलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधू टीमचं कर्णधारपद स्विकारलं आहे. भारताची शनिवारी युगांडाशी लढत होणार असून हा सामना होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.