Asia Cup 2023: रोहित शर्माची रणनिती तयार, या Playing 11 सह उतरणार मैदानात

एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे. चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या म्हणण्यानुसार केएल राहुल महिन्याअखेपर्यंत पूर्णपणे फिट असेल. अशात रोहित शर्मा कोणत्या अकरा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 21, 2023, 09:55 PM IST
Asia Cup 2023: रोहित शर्माची रणनिती तयार, या Playing 11 सह उतरणार मैदानात  title=

India Squad for Asia Cup 2023 : पाकिस्तानात येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी (ODI WC 2023) होणाऱ्या या स्पर्धेकडे रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे एशिया कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या (Team India) कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाच बीसीसीआयने (BCCI) 17 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. एशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) निवडलेला भारतीय संघातील बहुतांत खेळाडू एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या एशिया कप स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. पण आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. यासाठी त्याल बेस्ट प्लेईंग XI निवडावी लागणार आहे. 

एशिया कप 2023 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर 2 सप्टेंबरला रंगणार आहे. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच हायव्होल्टाज सामना असतो. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे असतं. 

अशी असेल प्लेईंग इलेव्हन
एशिया कप स्पर्धेत बेस्ट प्लेईंग इलेव्हनसह (Playing XI) रोहित शर्मा मैदानात उतरेल. 17 खेळाडूंच्या भारतीय संघात केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. पण केएल राहुल अद्यापही दुखापतीतून पूर्ण पणे तंदरुस्त झालेला नाही. अजीत आगरकर यांच्या मते केएल राहुलला छोटी दुखापत आहे आणि तो 2 किंवा 3 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे फिट होईल. त्यामुळे केएल राहुलच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. अशात विकेटकिपर म्हणून इशान किशनला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळू शकते. इशानला संघात संधी मिळाल्यास, तो रोहित बरोबर ओपनिंग करण्याची शक्यता आहे. 

विराट कोहलीचा तिसरा क्रमांक फिक्स आहे. अशात शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो. पांचव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर तर सहाव्या क्रमांकावर उपकर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीला येऊ शकतो. 

गोलंदाजीत कोणाला संधी?
अष्टपैलू रवींद्र जडेजाचंही खेळणं निश्चित आहे. त्यामुळे सातव्या क्रमांकावर जडेजा असेल. जडेचाबरोबरच आणखी एका स्पिनराल संघात संधी मिळू शकते. कुलदीप यादवचा जबरदस्त फॉर्म बघता त्याला अंतिम अकारमध्ये तो दावेदार मानला जातोय. याशिवाय संघात तीन वेगवान गोलंदाज असतील. यात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचं खेळणं जवळपास निश्चित आहे. तिसरा वेगवाग गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. 

एशिया कपसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा