Asia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?

Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला.   

राजीव कासले | Updated: May 1, 2023, 04:48 PM IST
Asia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार? title=

Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तानमधल्या क्रिकेटप्रेमींसाठी आताची मोठी बातमी. आयपीएलनंतर (IPL 2023) म्हणजे सप्टेंबर महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या एशिया कप स्पर्धेवरुन (Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (BCCI vs PCB) सुरु असलेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. यंदाच्या एशिया कप स्पर्धेच्या आयोजनाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही अशी कठोर भूमिका भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतली आहे. यादरम्यान स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

एशिया कप 2023 रद्द होणार?
एशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला आहे. म्हणजे एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जातील. पण हा प्रस्ताव बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेलच्या प्रस्तावावर अडून बसलं तर यंदा एशिया कप स्पर्धाच रद्द होऊ शकते. इतकंच नाही तर एशिया कप स्पर्धा रद्द झाली तर त्याच काळात पाच देशांची मल्टी नेशन स्पर्धा भरवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचंही समोर आलं आहे. 

2008 नंतर पाकिस्तान दौरा नाही
भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर पाकिस्तानात खेळण्यासाठी गेलेला नाही. 2008 मध्ये एशिया कपसाठी भारतीय संघ शेवटचा पाकिस्तानात गेला होता. तर भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2012 मध्ये निर्धारित षटकांची क्रिकेट मालिका खेळवली गेली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ तीन T20 आणि तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज आणि श्रीलंकेने गेल्या काही वर्षात पाकिस्तानचा दौरा केला होता. 

एशिया कप 2022 आमने सामने
एशिया कप 2022 स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यात आली होती. पण लंकेत राजकीय परिस्थिती बिघडल्याने स्पर्धा युएईमध्ये खेळवली गेली.  त्यावेळी टी20 फॉर्मेटमध्ये स्पर्धा झाली. यंदाची संपूर्ण एशिया कप स्पर्धाच त्रयस्थ ठिकाणी व्हावी अशी मागणी बीसीसीआयने केली आहे. यंदा 50 षटकांचा फॉर्मेट असणार आहे. 

एशिया कप 2022 मध्ये लंका विजयी
2022 दुबईत झालेल्या एशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत तब्बल सहाव्यांदा खिताब आपल्या नावावर केला. याआधी श्रीलंकेने  1986, 1997, 2004, 2008  आणि 2014 मध्ये एशिया कप जेतेपदाचा मान पटकावला होता. श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 23 धावांनी मात करत थरारक विजय मिळवला होता.