क्रिकेटबरोबरच राजकारणाचं मैदानही गाजवलं , कर्णधार दीड लाख मतांनी विजयी

Shakib Al Hasan: क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने राजकारणाचं मैदानही गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. 

राजीव कासले | Updated: Jan 8, 2024, 12:52 PM IST
क्रिकेटबरोबरच राजकारणाचं मैदानही गाजवलं , कर्णधार दीड लाख मतांनी विजयी title=

Shakib Al Hasan : बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने राजकीय मैदानावर कमाल कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शाकिब अलन निवडणुकीत जवळपास दीड लाख मतांनी विजयी झाला आहे. पण राजकारणाच्या मैदानावर उतरल्यानंतरही शाकिब अलने (Shakib al Hasan) क्रिकेट खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही जबाबादारी एकत्र स्विकारण्यास आपण सज्ज असल्याचं शाकीबने स्पष्ट केलं आहे. बांगलादेश क्रिकेट संघासाठी (Bangladesh Cricket Team) कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाचं नेतृत्व केलेल्या शाकिब अल हसनने बांगलादेश लोकसभा निवडणुकीत (Bangladesh Election) मोठ्या फरकाने विजय मिळवला. 

शाकिब अल हसनने बांगलादेशमधल्या मगुरातल्या पश्चिम शहर मतदार संघातून निवडणूक लढवली. विजयावर शाकिब अल हसनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षातून शाकिबने उमेदवारी मिळवली. शाकिब अल हसनलला 1,85,388 मतं मिळाली. तर त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ  45,993 मतांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीत शाकिबने आधीच आपल्या विजयाचा दावा केला होता. शाकिब अल हसन सध्या बांगलादेश क्रिकेट संघासोबत नाहीए. निवडणूक प्रचारासाठी शाकिबने न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली होती. 

एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार
गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारतात खेळवल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शाकिब अल हसनने बांगलादेश क्रिके संघाचं नेतृत्व केलं होतं. या स्पर्धेत बांगलादेश संघाने चांगली कामगिरी केली. पण बांगलादेशला सेमीफायनल गाठता आली नाही. त्यामुळे विश्वचषकानंतर शाकिब अल क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती. पण आपण क्रिकेटमधून सन्यास घेणार नसल्याचं शाकिब अलने स्पष्ट केलंय. 

शेख हसीना चौथ्यांदा पंतप्रधान
दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना  (Sheikh Hasina) चौथ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने (Awami League) दमदार विजय मिळवला. अवामी लीगने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला. बांगालदेशमध्ये 12 व्यांदा राष्ट्रीय मतदान पार पडला. यावेळी इतिहासातील सर्वात कमी म्हणजे 40 टक्केचं मतदान झालं. शेख हसीना यांचा विजयाचा भारतालाही फायदा होणार आहे. शेख हसीना या भारताच्या भरोशाच्या सहयोगी असल्याचं याआधीही सिद्ध झालं आहे.

भारताच्या मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत.